पहूर, ता.जामनेर : प्रतिनिधी
येथील पाचोरा रोडवरील संतोषीमाता नगर मधील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय विवाहितेने गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी जामनेर पोलीसा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाचोरा रोडवरील संतोषीमाता नगरमध्ये योगेश गायकवाड हे पत्नी अर्चना गायकवाड व दोन मुलांसह रहिवासास आहे. योगेश गायकवाड हे महावितरण कंपनीत कामाला असून ते रात्रपाळीसाठी ड्युटीवर गेले होते तर घरी दोघ मुलांसह अर्चना ही एकटी होती. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास अर्चनाचा भाऊ नवल पाटील हा बहिण अर्चना हीस उपचारासाठी हॉस्पीटला न्यायचे आहे म्हणून निरोप देण्यासाठी आला होता. त्यावेळी गायकवाड कुटुंबातील दोघं मुलं समोरच्या रुममध्ये खेळत होते. नवल पाटील घरात आल्यावर त्यांनी मुलांना आईबद्दल विचारले असता मुलं म्हणाले की, आई आंघोळ करीत आहे, यावरुन नवल पाटील हे घरात बसून राहिले. परंतु बराच वेळ झाल्यावरही बहिण अर्चना ही बाहेर न आल्याने नवल पाटील यांनी भाची तनू हीस मम्मीला बघून ये असे सांगितले. यावरुन तनू ही बाथरूममध्ये तिच्या आईला पाहण्यासाठी गेली असता तनूने मोठ्ठा हंबरडाच फोडला. कारण अर्चना ही बाथरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. घटनेचे गांभीर्य पाहताच नवल पाटील यांनी तात्काळ पोलीसांशी संपर्क साधत सदर माहिती कळविली. दरम्यान, याचवेळी योगेश गायकवाड हा रात्रपाळीची ड्युटी आटोपून घरी आला होता. घटना स्थळाचा पंचनामा करत पोलीसांनी मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरीता रवाना केला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी जामनेर पोलीसात शून्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अर्चना हिच्या पार्थिवावर पहूर येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अर्चना हिने आत्महत्या का केली? याबाबत स्पष्ट कारण समजू शकले नाही.
अर्चना गायकवाड ही खर्चाणे येथील प्रगतिशील शेतकरी सुपडू पाटील यांची कन्या होती. तर तिचा भाऊ नवल पाटील हा पहूर येथेच दुग्ध व्यवसाय करतो. मृत अर्चनाच्या पश्चात पती योगेश, एक आठ वर्षाचा मुलगा व चार वर्षाची मुलगी तनू असा परिवार आहे.