पहिल्या दिवशी शरयू दातेंच्या सुरांनी रसिकांना केले मंत्रमुग्ध

0
61

जळगाव ः प्रतिनिधी
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या १९व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा काल सायंकाळी ६.३० वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात श्रीगणेशा झाला. तीन दिवसीय महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शरयू दाते हिने गायलेल्या भजन, शास्त्रीय-उपशास्त्रीय गायनाने तर आश्विन श्रीनिवासन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सादर केलेल्या बासरी वादनाने महोत्सव चांगलाच रंगला. कोरोनाच्या संकटातील तब्बल १० महिन्यांनंतर जळगावकर रसिकांनी संगीताची अलौकिक अनुभूती अनुभवली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून आसन क्षमतेच्या ५० टक्के रसिकांनाच बालगंधर्व महोत्सवास प्रवेश देण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर भारतीताई सोनवणे, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक मुकेशकुमार सिंग, विक्रमसिंग नेगी, बँक ऑफ महाराष्ट्राचे परिमंडळ व्यवस्थापक राजेश देशमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कलाकारांचा सत्कार करण्यात आला. पहिल्या दिवसाच्या प्रथम सत्रात मुंबई येथील शरयू दाते हिने रागेश्री रागाने सुरुवात करत रसिकांची मने जिंकली. दीप्ती भागवत यांनी सूत्रसंचालन केले.
बासरी अन् गिटारची जुगलबंदी
दुसर्‍या सत्रात मुंबई येथील प्रसिद्ध बासरीवादक अश्विन श्रीनिवासन यांनी आपल्या बासरीची अलौकिक अशी अनुभूती जळगावकरांना दिली. राग झिंज सादर करत विलंबित एक ताल, मध्यालय बंदिश आणि तराणा सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर ‘घेई चांद सवेरा’ हे नाट्यगीत सादर करत रसिकांची दाद मिळवली. ‘ठुमूक चालत’ हे भजन देखील बासरीवर सादर केले. यानंतर गिटार आणि बासरीचे फ्यूजन सादर करण्यात आले. ‘पत्ता-पत्ता, अपनी तस्वीर को’ आणि ‘ख्याल हू’ या गझलाही त्यांनी सादर केल्या. शेवटी ‘या चिमण्यांनो’ हे भावगीत ऐकताना श्रोत्यांनी दाद दिली. या कार्यक्रमात तबल्याची साथ ओजस अधिया, गिटारची साथ संजोय दास यांनी दिली.
‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ने मिळवली दाद
पहिल्या सत्रात शरयू दाते हिने शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन करत रसिकांची मने जिंकली. रागेश्री रागाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विलंबित तीन ताल ‘आली री पलक न लागी’ सादर केले. द्रुत बंदिश तीन तालमध्ये ‘मोरा मन बस कर लिनो श्याम’ ही जितेंद्र अभिषेकी यांची बंदिश सादर करण्यात आली. दादरा मिश्र मांडमध्ये ‘सजन बिना ना लागे जिया मोरा’ सादर करत रसिकांना खिळवून ठेवण्यात आले.
याच कार्यक्रमात संवादिनीवर साथ देणार्‍या मिलिंद कुलकर्णी यांची रचना असलेले मीरा भजन ही शरयूने तन्मयतेने गायिले तेव्हा श्रोत्यांनी उत्फूर्त दाद दिली. ‘पिया बिन सुनो छेजो महारो डेस’ हे नाट्यगीत देखील तिने सादर केले. शेवटी ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ हा अभंग सादर करत प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद मिळवला. शरयूच्या गायनाला तबल्याची साथ चारुदत्त फडके यांनी, हार्मोनियमची साथ मिलिंद कुलकर्णी यांनी तर तानपुर्‍याची साथ अनघा गोडबोले व श्रुती वैद्य यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here