जळगाव ः प्रतिनिधी
बीएचआर घोटाळा प्रकरणात एका नेत्याने बारामतीला जावून पवार साहेबांंची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र पवार साहेबांनी त्याला भेट दिली नाही.आमचे नेते अशा प्रकरणात चुकीच्या माणसांची कधीच पाठराखण करणार नाहीत,याची शाश्वती आम्हाला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात पाठीराखा असल्याशिवाय सुनिल झंवर इतका मोठा घोटाळा करू शकणार नाही,याची जाणीव सर्वसामान्यांना नक्कीच झाली आहे अशा शब्दात माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी,गिरीश महाजन यांचे नाव न घेता पत्रकार परिषदेत चौफेर टोलेबाजी करून संभ्रम दूर केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी काल राष्ट्रवादीची बैठक झाली. यानंतर पत्रकारांशी बोलतांना माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनी बीएचआर प्रकरणावर भाष्य केले. ते पुढे म्हणाले की,या बँकेत सर्वसामान्यांच्या ठेवी अडकल्या आहेत. या संस्थेच्या घोटाळ्यातील आरोपींनी व इतर लाभार्थीनी देशभरात मोठ्या मालमत्ता विकत घेतल्या आहेत.या प्रकरणाची चौकशी आदेश केंद्रीय मंत्र्यांकडून होवूनही आधीच्या सरकारने चौकशी कुणाच्या सांगण्यावरूनच दडपून ठेवली होती हे ठेवीदारांनाही कळून चुकले आहे मात्र महाविकास आघाडी सरकारने ठेवीदारांच्या भावनांचा आदर करून या प्रकरणाला गती दिल्यामुळे सर्वसामान्यांच्या ठेवी मिळण्याची शाश्वती निर्माण झाली आहे.
डॉ.पाटील यांना या प्रकरणात गिरीश महाजन यांनी बारामतीला जाऊन शरद पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.यावर ते म्हणाले की, बारामतीला कोण गेले हे आपल्याला माहित नाही मात्र जे कोणी गेले त्यांना भेट देण्यास पवार साहेबांनी सपशेल नकार दिल्याची मिळाली आहे. आमचे नेते या प्रकाराची पाठराखण कधीच करणार नाही.सुनील झंवर हा माजी मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय असल्याबद्दल
विचारणा केली असता ते म्हणाले की, कोण कुणाचा डावा की उजवा ? हे आपल्याला माहिती नाही. मात्र कुणी पाठीराखा असल्याशिवाय सुनील झंवर इतका मोठा घोटाळा करू शकणार नाही
हेही तेव्हढेच खरे. राष्ट्रवादीच्याच काही जणांनी देखील कर्ज घेतल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, थकबाकीदार हा कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याच्यावर कारवाई व्हायलाच हवी या मताचा मी आहे,
असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.