जळगाव : प्रतिनिधी
राज्यात सर्वत्र लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. १८ वर्षे पूर्ण असलेल्या युवकाला लसीकरणाची संधी मिळत आहे. यंदा कोरोनाने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत; परंतु बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या आगामी काही महिन्यांमध्ये होणार आहेत. या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी शासनाने नियमांमध्ये शिथिलता आणून परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करावे अशी मागणी एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे मराठे यांनी सांगितले.
बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे १५ लाख विद्यार्थी बसले आहेत. परीक्षेदरम्यान या संपूर्ण विद्यार्थ्यांचे आरोग्य कसे जपले जाईल व या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोरोनाची बाधा होणार नाही, यासंबंधीची काळजी कशी घेता येईल. याबद्दल जिल्हा एनएसयूआय संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दूरध्वनीवरून महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी लसीकरणाबात चर्चा केली.
बारावीच्या विद्यार्थ्यांचे वय हे अठरा वर्षे पूर्ण झालेले नसते. १८ वर्ष पूर्ण वयाच्या नियमांमध्ये जर महाराष्ट्र सरकारने शिथिलता आणल्यास तसेच बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र जर परीक्षेच्या दीड महिने आधी उपलब्ध करून दिले तर बारावीच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्याकरिता प्रवेश पत्रकाच्या आधारावरती या संपूर्ण विद्यार्थ्यांचे तात्काळ दोन्ही डोस देऊन लसीकरण करता येईल. म्हणजेच आगामी काळामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोरोनाचा कुठलाही धोका राहणार नाही अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी आरोग्य मंत्री टोपे यांनी लसीकरणाबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याचे मराठे यांनी सांगितले.