जळगाव, प्रतिनिधी । आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या परिचारिकांना बुधवारी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लाॅरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात जिल्ह्यातील जळगाव खुर्द येथील उपकेंद्रातील परिचारिका प्रेमलता संजय पाटील यांचाही समावेश आहे. १२ मे रोजी फ्लाॅरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिन हा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.
कोरोना महामारीची साथ मागील वर्षापासून सुरू असल्यामुळे यावर्षी १२ मे रोजी हा कार्यक्रम होऊ शकला नाही. बुधवारी दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून वर्ष २०२०चे राष्ट्रीय फ्लाॅरेन्स नाइटिंगेल पुरस्कार वितरण सोहळा झाला. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार या उपस्थित होत्या. गेल्या १४ वर्षांपासून त्या आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. पदक, प्रशस्तिपत्र व ५० हजार रुपये रोख असे पुरस्कार स्वरूप अाहे.