पण नविन रस्ते जाऊ द्या,दुरुस्ती तरी लवकर होणार का?

0
11

जळगाव ः विशेष प्रतिनिधी
जळगाव महापालिकेत आता भाजप सत्तेत नसून शिवसेनेची सत्ता आहे.जळगावकर सुज्ञ व जाणकार मतदारांनी तत्कालीन वजनदार मंत्री व संकटमोचक गिरीश महाजन यांच्यावर विश्वास ठेवत २०१८ च्या महापालिका निवडणुकीत भजपाला एकहाती सत्ता बहाल केली होती.तब्बल अडीच वर्षे महापालिकेत भाजपची सत्ता होती.भाजपच्याच नगरसेवकांचा भ्रमनिरास झाला व त्यांनी स्वपक्षाची साथ सोडून भगवा हाती घेतला आणि महापालिकेत सत्तांतर झाले.
या शहराची मुख्य समस्या रस्त्यांची असून खराब रस्त्याची झळ महापौर सौ.जयश्रीताई महाजन यांनाही बसली आहे.गेली अडीच वर्षे शहरातील रस्त्यांसाठी करोडो रुपयांची वेगवेगळी आकडेवारी सांगितली गेली मात्र रस्ते झाले नाहीत.आता पुन्हा एकदा शहरातील रस्त्यांसाठी १२५ कोटींची तरतूद केल्याचे सांगण्यात आले आहे.म्हणून हा उहापोह.
जळगाव शहर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजूमामा भोळे याना सलग दुसर्‍या वेळी जळगावकर मतदारांनी आमदार म्हणून संधी दिली आहे.महापालिकेत भाजपची सत्ता आली त्यावेळी त्यांच्याच सौभाग्यवती (सीमाताई भोळे) पहिल्या महापौर झाल्या होत्या.चांगल्या १६ महिन्यांचा कार्यकाल त्यांना मिळाला होता .पती आमदार अन् पत्नी महापौर असे असतांना शहरात किमान रस्त्यांची कामे होतील पण ती झाली नाहीत.आमदार भोळे यांच्याकडून जी कामे झाल्याचे सांगण्यात येते त्याबद्दलही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. महापालिकेची कर्जमुक्ती यावर सध्या माजी विरोधक तर आताच्या सत्ताधार्‍यांकडून आरोप होत आहेत.
जळगाव शहरात नवीन रस्ते केव्हा होतील याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे मात्र रस्त्यांची थातुरमातुर डागडुजी सध्या सुरू आहे.दगडापेक्षा वीट मऊ म्हणतात .त्याप्रमाणे अमृत,भुयारी गटार व मल निस्सारणसाठी खोदलेल्या चार्‍यांची डागडुजी पाहता असेच म्हणणे योग्य ठरेल.कारण जाड खडीवर डांबर शिडकून त्यावर बारीक खडी अंथरली जात आहे.ते धोकादायक ठरत आहे.ते काम टिकाऊ तर नाहीच,पण जीवघेणे ठरत असल्याचे चित्र आहे. रस्त्यांची दुरुस्ती पाहिजे तशी होतांना दिसत नसल्याने जळगावकरांना खड्डे बुजविले जात असल्याचे दाखविण्यात येत आहे.यासाठी किती कोटी खर्च होणार,किती दाखविला जाणार हे कोडे आहे.वास्तविक अशी कोट्यवधींची डागडुजी करण्यापेक्षा टिकाऊ नवीन रस्ते बनविण्यास प्राधान्य द्यायला हवे होते पण तसे होत नसल्याने नव्या रस्त्यांसाठी आणखी सहा महिने वाट पाहावी लागेल अशी लोकभावना आहे.
जळगाव शहरातील रस्त्यांसाठी आधीच्या (भाजप) सत्ताधार्‍यांनी व आमदार राजूमामा भोळे यांनी वेगवेगळी आकडेवारी सांगितली आहे.प्रथम रस्त्यांसाठी २८ कोटी रुपये खर्च होणार असे सांगण्यात आले.त्यांनतर शासनाकडून मिळणारे ४२ कोटी मिळून एकूण ७० कोटी रुपयात शहरातील रस्ते बनविण्याचे सांगण्यात आले.त्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सहकार्य मागण्यात आले मात्र कोणतीच प्रगती नाही व नव्हती.
नंतर याच भाजपच्या सत्ताधारी व आमदार यांच्याकडून रस्त्यांसाठी १०० कोटीचा आकडा सांगण्यात आला आणि आता भाजपची सत्ता जाऊन शिवसेनेची आली आहे .रस्त्यांच्या कामाचा पत्ता नाही.कामे दृष्टिपथास नाहीत आणि आता स्थायीच्या सभेत मंजूर अंदाजपत्रक पाहता शहरातील नवीन रस्त्यांसाठी १२५ कोटींची मंजुरी सांगितली आहे.शहरातील नागरिकांना संभ्रमित करण्याचा हा प्रकार असल्याचे म्हटले जात आहे .आकडे कोटी-कोटींचे सांगितले जात आहेत.लोकांच्या हालअपेष्टा होत आहेत आणि येथे फक्त कोटींची उड्डाणे सुरू आहेत आणि सद्यस्थितीत थातूरमातूर डागडुजी सुरूच आहे.नवे रस्ते करणार,त्यासाठी १२५ कोटी लावणार आहात तर ही डागडुजी का करता? लोकांचा पैसा पाण्यात का घालता, हा जनतेचा प्रश्न आहे.
वास्तविक नवीन रस्त्यांची कामे करायची तर आताच सुरुवात करावी लागेल.तेव्हा कुठे एप्रिल आणि में या दोन महिन्यात अर्ध्यापेक्षा जास्त रस्त्यांची कामे आटोपतील व शहरातील लोकांना ते दिसेल.उर्वरित कामे दिवाळी नंतर केले तरी चालणार आहे .कारण लोक कामाबद्दल शंका घेणार नाहीत आणि येथे महापालिकेत फक्त आणि फक्त कोट्यवधींच्या आकड्यांचा मेळ सुरू आहे.पैसे हातात नाहीत,ते मिळविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे .त्यासाठी किती काळ लागेल ते सांगता येणार नाही.परिणामी पावसाळा तोंडावर आहे.हे दोन महिने निघून गेले तर डांबरीकरणाचे काम पावसाळ्यात होत नसल्याने त्यामुळे पैसे हातात आले तरीही नोव्हेंबर नंतरच नवीन रस्त्यांची कामे मार्गी लागू शकतील हे निश्चित म्हटले जात आहे.तोवर जळगावकरांनो खड्ड्यातूनच जा,आनंदी जीवन जगा, असे शहरातील लोकांचे महापालिकेतील जुन्या-नव्या सत्ताधार्‍यांना टोमणे आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here