जळगाव : प्रतिनिधी
उन्हाळ्याची चाहूल लागताच पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यंदा मार्च महिना लागताच उन्हाची तीव्रता प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे सध्याचे तापमान लक्षात घेता पंचरत्न प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी शहरातील वेगवेगळ्या रहिवासी भागात जाऊन पक्ष्यांसाठी पाणी पिण्याची मातीची भांडी वाटप केली.
अभियानात शुक्रवारी पहिल्या टप्प्यात पन्नास भांडी घरोघरी जाऊन देण्यात आली. नागरिकांनी आपल्या परिसरात पक्ष्यांना पाणी व धान्य ठेवावे असे आवाहन या वेळी करण्यात आले. पुढील काही दिवसांत हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे.
शहरातील गिरणा टाकीच्या मागील परिसर, रामानंद नगर, स्टेट बँक कॉलनी, स्वातंत्र्य चौकातील कॉलन्यांत राबवलेल्या या उपक्रमात अध्यक्षा वैशाली पाटील, नीता भंडारी, सोनल पाटील यांनी सहभाग नोंदवला.