महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मात्र ज्या राज्यांत निवडणुका आहेत अशा राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढताना कसे दिसत नाहीत, अशी शंका मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी उपस्थित केली आहे.
मुंबई: राज्यात करोनाच उद्रेक झाला असून दिवसेंदिवस नव्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. देशातील राज्यांच्या विचार केल्यास सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात असून करोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मात्र राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असताना ज्या राज्यात निवडणुका आहेत अशा राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढताना कसे दिसत नाहीत, अशी शंका मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी उपस्थित केली आहे.
केवळ महाराष्ट्रातच करोनाचे रुग्ण का वाढत आहेत आणि जेथे निवडणूक आहे अशा राज्यांमध्ये रुग्ण का वाढत नाहीत, याचा अभ्यास करण्याच्या सूचना आम्ही कोविड-१९ टास्क फोर्सला केल्या असल्याचे अस्लम शेख यांनी म्हटले आहे. निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये अनेक नेते प्रचंड मोठ्या सभा घेत आहेत. मात्र अशा ठिकाणी करोनाचे रुग्ण वाढताना दिसत नाहीत, असे निरीक्षणही शेख यांनी नोंदवले आहे.
महाराष्ट्रात करोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३३ लाख ४३ हजार ९५१ इतकी आहे. तर देशाने विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहिलेल्या पश्चिम बंगालमध्ये ही संख्या ६ लाख १० हजार ४९८ इतकी आहे.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे मुंबई कोविड सेंटर्स उभे करण्याच्या दृष्टीने पाहणी करत आहेत. मुंबईत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून अधिकाधिक बेड आणि कोविड सेंटर्स उभे राहिल्यास रुग्णांना वेळेत सेवा मिळू शकेल आणि प्रशासनावर देखील ताण येणार नाही, यादृष्टीने देखील ते प्रयत्नशील आहेत.
दरम्यान, राज्यातील करोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रामुख्याने राज्यात पूर्ण लॉकडाउन लागू करावा का, याबाबत चर्चा करण्यात येत आहे. राज्यात लॉकडाउन लागू केल्यास तो ८ दिवसांचा असावा की १४ दिवसांचा असावा, याबाबत विचारविनिमय केला जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात ८ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे मत मांडले असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला राज्यातील प्रसिद्ध डॉक्टर्स उपस्थित असून काही इतर तज्ज्ञही सहभागी झाले आहेत.