नाशिक : नाशिकमध्ये राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त (Rajmata Jijau Jayanti)राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ मोहीम सुरू केले आहे. राजमाता जिजाऊंना अभिवादन करून या मोहिमेचा नारळ फोडण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पक्षाची धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली जातील, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कर्डक यांनी केले. या मोहिमेचा नारळ पंचवटी येथील विभागीय अध्यक्ष शंकर मोकळ (Shankar Mokad) यांच्या संपर्क कार्यालयात फुटला.
बाळासाहेब कर्डक म्हणाले की, नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा घेतला. त्यावेळी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. आगामी महापालिका निवडणूक छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने रणशिंग फुंकले असून आज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त पंचवटी विभागात ‘राष्ट्रवादी परिवार संवाद अभियान’ राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रणशिंग फुंकले असून, आज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने पंचवटी विभागात राष्ट्रवादी परिवार संवाद अभियानास सुरुवात करण्यात येत आहे. राजमाता जिजाऊंनी स्वराज्याची संकल्पना मांडली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ती संकल्पना पूर्ण केली. ही संकल्पना घेऊन राष्ट्रवादीने महापालिकेवर सत्ता काबीज करण्याचा निर्णय घेतल्याचे कर्डक म्हणाले.
तसेच नाशिक महानगरातील समस्या जाणून घेऊन आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न केला जाईल. राष्ट्रवादी संवाद अभियान राबविताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना केल्या जातील आणि नियमांचे पालन केले जाईल, असेही कर्डक म्हणाले.