जळगाव ः प्रतिनिधी
राज्यातील कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सहकार विभागाने राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश काल दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील जिल्हा मध्यवर्ती बंँकेसह ८२ सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.
न्यायालयाचे आदेश व २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृह निर्माण संस्था आदेशाने वगळण्यात आल्या. कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे सलग दुसर्यांदा सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेसह ८२ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
जिल्हा बँकेचे विकासो व इतर संस्थांचे ठरावही प्राप्त झाले होते.त्याला सहकार विभागाकडून मंजुरी देण्यात आली. जिल्हा बँकेडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. न्यायालयीन आदेश, निवडणूक प्रक्रियेतील टप्पा व संचालक मंडळाची मुदत संपल्याचा दिनांक या बाबी विचारात घेऊन सहा टप्प्यांचा समावेश असलेला जिल्हा निवडणूक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील ब, क व ड वर्गातील जिल्हा बँक, १३ विविध कार्यकारी सोसायटी, तालुका पतसंस्था व इतर संस्थांचा समावेश आहे. जिल्ह्यात अ ते क वर्गातील १ हजार ११८ सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांचा कालावधी संपुष्टात आलेला आहे. सर्वोदय शिक्षण प्रसार मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरु राहणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बीडवई यांनी दिली.