मुंबई, वृत्तसंस्था । दुकाने, उपाहारगृहे, मॉलची वेळमर्यादा वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. करमणूक उद्यानेही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात दुकाने आणि उपाहारगृहांची वेळमर्यादा वाढवून देण्याची मागणी दुकानदार, व्यापारी आणि उपाहारगृह मालकांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानंतर आता याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स रात्री १२ वाजेपर्यंत तर सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सोमवारी टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील उपहारगृहे आणि दुकाने यांची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला. २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृह सुरू केली जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपहारगृहांची वेळ देखील वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. ही वेळ वाढवली जाणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
रुग्णसंख्या घटल्याने निर्बंध शिथिल करावेत आणि दुकानांच्या वेळा वाढवून देण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे के ली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाविषयक कृतिगटाच्या तज्ज्ञांशी सोमवारी सविस्तर चर्चा केली. त्यानंतरच दुकाने, उपाहारगृहांची वेळमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
करोनाचा संसर्ग कमी झाल्याने शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे तसेच नाट्यगृहे खुली करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. बुधवारपासून महाविद्यालये, तर शुक्रवारपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू होणार आहेत. त्याच दिवसापासून करमणूक उद्याने खुली करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता शॉपिंग मॉल, सर्र्व व्यापारी दुकानांची वेळ वाढवून देताना रात्री १२ नंतर कोणतेही दुकान सुरू राहणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आली आहे. वेळमर्यादा ठरविण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले असले तरी मुंबई, ठाणे, पुणे या मोठ्या शहरांमध्ये रात्री ११ पर्यंत व्यवहार खुले ठेवण्यास मुभा दिली आहे. याबाबत बुधवारी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत आहे.