मुंबई : शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. कणकवली येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालायनेही नितेश राणे यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. दरम्यान कोर्टाने मनीष दळवीला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिनावर निकालासाठी उच्च न्यायालयाने आजचा दिवस निश्चित केला होता. तोपर्यंत राणेंवर अटकेसारखी कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारकडून न्यायालयात देण्यात आली होती. मात्र संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत. तसेच ही घटना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळी खिल्ली उडवण्याआधी घडलेली आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली होती. मात्र आता न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे राजकीय सूड म्हणून नितेश यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही, असा दावा पोलिसांनी गुरुवारी उच्च न्यायालयात केला. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नितेश यांच्या याचिकेवर सोमवारी निर्णय देण्याचे स्पष्ट केलं होतं.दरम्यान नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला तरी सर्वोच्च न्यायालयात त्यांना या आदेशाला आव्हान देता यावे तोपर्यंत त्यांना
कारवाईपासून अंतरिम संरक्षण देण्याची मागणी त्यांच्या वकिलाने केली आहे. याबाबत १२.३० वाजता सुनावणी होणार आहे. यानंतर राणेंच्या अटकेची कारवाई पोलिसांकडून सुरू होईल.