ना सत्तेसाठी, ना स्वार्थासाठी…तळमळ असावी रयतेच्या मूलभूत सुविधांसाठी !

0
15

जळगाव ः विशेष प्रतिनिधी
जळगाव महापालिकेत सत्तांतर झाले, भाजपची सत्ता जाऊन शिवसेनेची आली आणि विरोधी पक्षनेते असलेल्या सुनिल महाजन यांच्या उच्च शिक्षित सौभाग्यवती जयश्रीताई महाजन महापौरपदी विराजमान झाल्या आहेत.सौ.महाजन महापौर झाल्याबद्दल सुनिल महाजन यांच्या मित्र परिवाराकडून अभिनंदनपर शुभेच्छा जाहिराती प्रसिद्ध झाल्या,त्यातील एकाच ओळी वरून जळगावकर नागरिकांत चर्चा सुरू झाल्या आहेत.साधा नगरसेवक असला तरी त्याचे कडून नागरिकांच्या मूलभूत नागरी सुविधांबद्दल अपेक्षा असतात.स्वच्छता -साफसफाई हवी, पिण्याचे पाणी मुबलक व नियमित मिळावे,दिवाबत्ती,रस्ते चांगले असावेत ,वगैरे वगैरे परंतु कोणी निवडून आला,नगरसेवक,आमदार किंवा खासदार जरी झाला तर आपला उत्कर्ष व्हावा,भरभराट व्हावी किंवा विकास व्हावा असे कुणालाही वाटण्याचे काही कारण नसते.गावाचा,परिसराचा,प्रभागाचा विकास झाला पाहिजे अशी अपेक्षा लोकप्रतिनिधीकडून असते.
मात्र रयत म्हणजे जनता,गावकरी यांचा उत्कर्ष,विकास अथवा भरभराट करण्याचा कोणत्याच लोकप्रतिनिधींचे काम नाही.अर्थात ते निवडून येतात त्यांच्याकडून त्या-त्या परिसराचा विकास व्हावा हीच अपेक्षा असते .महाजन यांच्या मित्र परिवाराने सौ.महाजन महापौरपदी विराजमान झाल्यानंतर अभिनंदन पर शुभेच्छा दिल्या त्यात … ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी… जीव तळमळतो फक्त रयतेच्या उत्कर्षासाठी…. असा शब्दप्रयोग वापरला असल्याने रयतेचा उत्कर्ष नव्हे तर रयतेच्या मूलभूत नागरी सुविधांसाठी जीव तळमळतो असे म्हणायला हवे होते असा सूर शहरातून उमटत आहे.
नगरपालिका अथवा महापालिका असो यातील प्रत्येक नगरसेवकांकडून स्थानिक नागरिकांच्या मूलभूत नागरी सुविधा मिळाव्यात याच अपेक्षा असतात आणि जळगावकर लोक त्यापासूनच वंचित आहेत.शहरातील रस्ते चांगले नाहीत,पिण्याचे पाणी नियमित वेळेवर मिळत नाही, सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे,नियमितपणे साफ सफाई होत नाही, कचरामुक्त शहर ही घोषणा असून कचराकुंड्या भरलेल्या ,गटारी तुंबलेल्या ,कचर्‍याचे ढीग,.स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी ,स्वच्छता गृहे अस्वच्छ अशी शहरातील अवस्था आहे .
महापालिकेला करांचा भरणा नियमितपणे करणार्‍या प्रत्येक नागरिकांना या सर्व मूलभूत नागरी सुविधा मिळाल्याचं पाहिजे व हा त्यांचा हक्कच आहे.वास्तवात जळगावकर नागरिक अशा सुख सुविधांपासून अनेक वर्षे वंचित आहेत.प्रत्येक नगरसेवक अर्थात लोकप्रतिनिधींचा जीव त्यासाठी खरोखरीच तळमळला पाहिजे.महापालिकेतील माजीमंत्री सुरेशदादा जैन यांच्या सुमारे ३० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावून २०१८ च्या निवडणुकीत भाजपने मोठ्या बहुमताने सत्ता प्राप्त केली पण त्या सत्ताधार्‍यांकडुनही रयतेचा भ्रमनिरास झाला.शेवटी सत्ता बदलली .त्यामुळे स्थनिकांच्या अपेक्षा उंचावणे स्वाभाविक आहे.
जळगाव शहराचा विस्तार झपाट्याने झाला आहे व होत आहे मात्र त्या तुलनेत शहराचा विकास झालेला नाही .महापालिकेची स्वमालकीची अनेक व्यापारी संकुले आहेत.सध्या भाडे करारावरून गाळे प्रश्न चिघळलेला आहे.तरीही महापालिकेची फुले ,सेंट्रलफुले मार्केट,गांधी मार्केट,चौबे मार्केट,भिकामचंद जुने व नवीन मार्केट ,गोलाणी मार्केट यांची अवस्था पाहण्यासारखी नाहीच.सर्वत्र घाणीचे साम्राज्य असलेली व साफ सफाई न होणारी ही संकुले आहेत.त्याकडे लक्ष देण्यास ना लोकप्रतिनिधींना वेळ ना प्रशासनाला.परिणामी या व्यापारी संकुलात जाणेसुद्धा लोक टाळतात.महापौर जयश्रीताई महाजन व नगरसेवक सुनिल महाजन यांनी शहराच्या विकासाचा ध्यास घेतला पाहिजे .शहरवासी ज्या-ज्या समस्यांनी ग्रस्त आहेत त्यांचे निराकरण करण्यास त्यांनी प्राधान्य द्यायला हवे .फक्त घोषणाबाजीने एकूण जळगावकर नागरिक आधीच …मामा… बनले आहेत.त्यापूर्वी येथील नागरिकांना चॉकलेटपरिचित होते .तुम्ही सत्ता हाती घेतली आहे.आता कामाची चुणूक दाखवा.नुसता जीव तळमळतो म्हणून चालणार नाही .तुम्ही तुमचे कर्तृत्व दाखवा. रस्त्यांचे नुतनीकरण नंतर करा पण नुसत्या रस्त्याच्या दुरुस्ती कामांना शहरातील प्रमुख रस्त्यांसह प्रत्येक प्रभागात सुरुवात करा.लोकांना धन्य वाटेल व तुम्ही अभिनंदनाचे हकदार व्हाल हे निश्चित.जळगावच्या रयतेला त्यांचा उत्कर्ष नको,त्यांना मूलभूत नागरी सुविधा हव्या आहेत.त्या प्रदान करण्यास प्राधान्य द्या,लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील इतके नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here