मुंबई, वृत्तसंस्था । नाशिक व रत्नागिरी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने नाशिक व रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना बळकट होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
टिळक भवन येथे, आमदार हिरामन खोसकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यात जिल्हा परिषदेचे माजी सभापती भाजपाचे संपतराव काळे, सरपंच बाळू वाजे, रतन बांबळे, राजाराम भोसले, ज्ञानेश्वर भोसले, दत्तू वाजे, सदाशिव काळे, विनायक काळे, पांडुरंग शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे निलेश कडू, तुकाराम सहाणे, मधूकर सहाणे, त्र्यंबक सहाणे, रमेश जाधव, देवराम नाठे, जयराम धांडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
तर रत्नागिरी जिल्ह्यातील मनसेचे राज्य सरचिटणीस खलील सुर्वे, दाऊद चौगुले, हमीद चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे कादीर चौगुले, शिवसेनेचे मोहम्मद अली सुर्वे, असाद सुर्वे, यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी प्रांताध्यक्ष पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे काँग्रेसमध्ये स्वागत करुन पुढील कार्यासाठी पटोले यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, राज्यमंत्री विश्वजित कदम, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, माजी आमदार हुस्नबानो खलिफे, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस देवानंद पवार, अविनाश लाड, मनोज शिंदे आदी उपस्थित होते.