नाशिक – प्रतिनिधी
शहरात करोना रुग्णांची संख्या घटत असताना, मृत्युदर मात्र वाढत असल्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. एप्रिल व मे महिन्यात खासगी रुग्णालयांनी आपल्याकडील रुग्णांच्या मृत्यूची नोंद आयसीएमआर पोर्टलवर वेळेत न करता रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर सुरू केल्याने दररोज मृतांचा आकडा वाढत आहे. विशेष म्हणजे एप्रिलमध्ये शहरात ३९४, तर मे महिन्यात आतापर्यंत ३६५ मृत्यूंची नोंद झाली असून, हा आकडा आणखी वाढणार आहे. दुसरीकडे नाशिकमधील स्मशानभूमीतील आकडा मात्र दीड हजारावर असल्यामुळे आकड्यांची लपवाछपवी होत असल्याचे दिसून येत आहे.
आकडेवारी अपडेट करण्याचे आदेश
नियमानुसार आयसीएमआर पोर्टलवर नोंद झालेल्या मृत्यूचे आकडेच पालिकेला जाहीर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे शहरात अधिक करोनामृत्यू होऊनदेखील पोर्टलवरील आकडेच अधिकृत असल्याचा दावा पालिकेकडून केला जात आहे. दुसरीकडे पालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील सर्व रुग्णालयांना तोंडी सूचना देऊन करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची नावे पोर्टलवर टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या रुग्णालयांकडून दररोज आकडे अपडेट केले जात असल्यामुळे एकीकडे रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे, दुसरीकडे मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. हा आकडा अजूनही अपडेट केला जात असल्याने तो वाढण्याची शक्यता वैद्यकीय विभागाने व्यक्त केली आहे.
दोन ठिकाणीच १,७५३ मृत्यूंची नोंद
महापालिकेच्या दप्तरी सध्या दोन महिन्यात ७५९ करोनाबाधितांच्या मृतांची नोंद असली तरी, शहरातील १७ स्मशानभूमीतील अंत्यसंस्काराचा आकडा मात्र यापेक्षा दुपटीने जास्त आहे. गेल्या दोन महिन्यांत स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी वेटिंग होते. पंचवटी आणि जुने नाशिकमधील दोन स्मशानभूमींमध्ये एप्रिल वे मे या दोन महिन्यांत १,७५३ अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. त्यामुळे करोना मृतांच्या आकडेवारीत मोठा फरक दिसत आहे. तर दुसरीकडे स्मशानभूमीत ग्रामीण भागातील मृतांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याचा दावा पालिकेकडून केला जात आहे. त्यामुळे केवळ दोन महिन्यात पालिका हद्दीत ७५९ मृतांचीच नोंद झाल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला आहे.
करोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे मध्यंतरी खासगी रुग्णालयांनी आपल्याकडील करोनाने मृत झालेल्या व्यक्तींची नावे आयसीएमआर पोर्टलवर अपडेट केलेली नव्हती. परंतु, आता ही आकडेवारी अपडेट केली जात असल्याने मृतांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.
– डॉ. आवेश पलोड, नोडल अधिकारी, मनपा