नाना पटोलेंची जीभ कापणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षिस देणार भाजप पदाधिकारी

0
71

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी भंडारा जिल्ह्यात मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठय़ा राजकीय वादाला तोंड फोडले आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोललो नसून गावातील गुंडाबाबत बोललो असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. पण राज्यामधील राजकारण पटोले यांच्या या वक्तव्यानंतर चांगलेच तापले आहे. मंगळवारी राज्यातील अनेक ठिकाणी भाजपने आंदोलने, निदर्शने करुन नाना पटोलेंच्या वक्तव्याचा निषेध केला. अनेक ठिकाणी नाना पटोलेंच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, नाना पटोलेंची जीभ कापणाऱ्याला एक लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा करत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य जालन्यातील भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षांनी केले आहे.

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पदाधिकाऱ्याचे नाव सुजीत जोगस असे असून ते जालना भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. नाना पटोलेंची मस्ती वाढली आहे. ती कशामुळे वाढली, तर राज्यामध्ये अराजकता माजवणारे काँग्रेसचे सरकार आल्यामुळेच नाना पटोलेंना बळ मिळाले आहे. याच कारणामुळे नाना पटोले देशातील आपल्या यशस्वी पंतप्रधानांना काहीही म्हणत आहात. मारहाण करण्याची भाषा देखील बोलली गेली, ही चुकीची भाषा असल्याचे जोगस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

तसेच जोगस पुढे बोलताना म्हणाले, भाजप युवा मोर्चाच्यावतीने मी आवाहन करतो की नाना पटोलेंची जीभ कापणाऱ्याला एक लाख रोख रक्कमेचे बक्षिस आम्ही आज आमच्यावतीने घोषित करतो. महाराष्ट्रामधील जो कोणी या नाना पटोलेची जीभ कापून आणेल, त्याला एक लाख रुपये भाजप युवा मोर्चा जालनाच्यावतीने आम्ही रोख रक्कम स्वरुपात देणार असल्याचे जोगस यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here