जळगाव : प्रतिनिधी
वरणगाव येथील तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराला जिल्ह्यातील सर्वाधिक सुंदर तीर्थक्षेत्र बनवू असे संस्थानचे अध्यक्ष चंदक्रांत बढे यांनी सांगितले. या कामांसाठी तत्कालीन मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी पर्यटन विभागाच्या माध्यमातून २ कोटी ७४ लाख रुपये निधी मंजूर करून दिला होता. त्यातून शुक्रवारी नियोजित कामांचा नारळ वाढवताना बढे बोलत होते.
तत्कालिन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी नागेश्वर महादेव मंदिराच्या सुशोभीकरणासाठी २ कोटी ७४ लाख रुपये मंजूर केले होते. या निधीतून सभामंडप, पेव्हर ब्लॉक, उद्यान, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय आदी सुविधांसह तीर्थक्षेत्र नागेश्वर मंदिर ते वरणगाव येथील रेस्टहाऊस पर्यंत रस्ता रुंदीकरण, दुभाजक, पथदिवे या कामांचा समावेश आहे. या कामांना सुरुवात करताना माजी नगराध्यक्ष सुनिल काळे, संस्थानचे बी.एम.पाटील, भाजप शहराध्यक्ष सुनिल माळी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संतोष माळी, भाजप शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, मिलिंद भैसे, पप्पू ठाकरे यांची उपस्थिती होती.
‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या दर्जासाठी पाठपुरावा
तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराला शासनाने अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा. संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत बढे यांच्या संकल्पनेतून येथे गरजेची कामे होतील. त्यामुळे शहराला नवीन ओळख मिळण्यास मदत होईल.
– सुनिल काळे,
माजी नगराध्यक्ष, वरणगाव