जळगाव : प्रतिनिधी
नवीन शिक्षण नीती धोरणात योग विषयाचा समावेश, शालांत तसेच उच्च माध्यमिक शाळेमध्ये प्रमुख विषयामध्ये योगास स्थान देणे, महाविद्यालयात योग विषय अनिवार्य करणे, मनपा तसेच जिल्हा परिषद शाळेत योग विषयाचा समावेश, युजीसी मान्यताप्राप्त अस्थापना मधून प्रशिक्षित योग शिक्षकांना प्राधान्य देणे आदी प्रमुख मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जळगाव महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी आणि महापौर भारतीताई सोनवणे यांना देण्यात आले.
अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या जळगाव शाखेचा नुकताच शुभारंभ झाला. त्यानंतर महासंघाच्या वतीने योग शास्त्राच्या प्रचाराची मोहीम सुरू केलेली आहे. गुरूमुखातून प्रकट ज्ञानाला पुन्हा शिक्षणाचा दर्जा देण्यासाठी योग महासंघाच्यावतीने जळगाव जिल्ह्यातील प्रमुख धोरणकर्त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले
आहे.
निवेदन देतेवेळी जळगाव महासंघाचे जिल्हा प्रभारी हेमांगी सोनवणे,प्रा. अविनाश कुमावत, मीडिया प्रभारी प्रा. कृणाल महाजन, सहप्रभारी डॉ. माहेश्वरी, अरविंद सापकर, मनीषा पाठक, रजनी भावसार आदी उपस्थित होते.