जळगाव ः प्रतिनिधी
जिल्ह्यात आजपासून (दि. १ एप्रिल) लसीकरणाच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात होत आहे. यात ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस टोचून घेता येणार आहे.त्यासाठी शहरात १८ खासगी वाढीव केंद्रांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता मात्र,त्यापैकी फक्त २ केंद्रांनाच परवानगी मिळाली आहे.त्यामुळे शहरातील पूर्वीचे १८ व नवीन वाढीव २ असे २० केंद्रांवर लस घेता येणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या लस पुरवठा करणार्या स्टोअर्सकडे एकही लसीचा डोस शिल्लक नाही. आज गुरुवारी नवीन २७ हजार डोस प्राप्त होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात आतापर्यंत लसीकरणाचे चार टप्पे झालेत. त्यात १ लाख ४३ हजार ६४९ लाभार्थींना लस देण्यात आली आहे. तसेच पाच टप्प्यात जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ७७ हजार लसींचे डोस प्राप्त झालेत. यात १ लाख ५९ हजार ३४० कोवीशिल्ड तर १८ हजार को-व्हॅक्सीनचे डोस होते. बुधवारी यातील अखेरचे ४१० डोसचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
लसींचे डोस आज मिळणार
शहरात केवळ दोनच केंद्रांना परवानगी मिळाली, हे केंद्र कोणते, याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. पाचोरा व अमळनेर या ठिकाणीही प्रत्येकी एक केंद्राची वाढ झाली आहे. नव्या टप्प्यासाठी उपसंचालक आरोग्य कार्यालयाकडून जिल्ह्याला २७ हजार लसीचे डोस गुरुवारी दुपारनंतर प्राप्त होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेल्या सहा महिन्यात कमी अधिक प्रमाणात शिथील केलेल्या निर्बंधांनी व सर्वसामान्यांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा कोरोना पूर्वीसारखा थैमान घालू लागला आहे. शिवाय, विषाणूत जनुकीय बदल झाल्यामुळे यावेळी बाहेरून मोजता येणार नाहीत अशी लक्षणे वाढली असून पूर्वीच्या लक्षणांमध्ये बदल झाला आहे.डोकेदुखी, जुलाब होणे, उलट्या होणे, कमी ऐकू येणे अशी लक्षणे समोर आली आहेत. ते सार्वजनिक स्थळी सहज वावरत असल्याने ते कोरोनाचे मोठे वाहक झाले आहेत. त्यामुळेही रुग्णांची संख्या वाढते आहे. ही साखळी खंडित होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे.