जळगाव, प्रतिनिधी । झोपलेल्या नऊ वर्षीय अल्पवयीन गतीमंद मुलीस शेतात उचलुन घेऊन जात अत्याचार करणाऱ्या आरोपीस १४ वर्षे सक्तमजुरी व नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी न्यायालयाने ठोठावली.
अर्जुन अशोक पाटील असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. पाटील हा रिक्षाचालक आहे. २० फेब्रुवारी २०१४ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अर्जुनने तालुक्यातील तुरखेडा येथे वीटभट्टीवर राहणाऱ्या नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीस घरातून उचलुन नेले. यानंतर शेतात घेऊन जात दमदाटी करुन तीच्यावर अत्याचार केले. ही मुलगी गतीमंद आहे. २१ रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर मुलीच्या अाईने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात पोक्सो, अत्याचार व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. २१ राेजीच पोलिसांनी अर्जुनला अटक केली होती.
तपासाधिकारी तथा पोलिस निरीक्षक प्रवीण वाडीले यांनी तपास पुर्ण करुन न्यायाधीश डी. एस. खडसे यांच्या न्यायालयात दोषारोप सादर केले. सरकारपक्षातर्फे एकुण १७ साक्षीदार तपासले. यात पिडीत मुलगी गतीमंद असल्यामुळे गतीमंद मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापकांसमक्ष न्यायालयात तीची साक्ष घेण्यात आली. ही साक्ष अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. अर्जुन हा तुरखेडा पासून काही अंतरावर असलेल्या पंचक या गावात राहत होता. २० फेब्रुवारी रिक्षा बंद पडल्यामुळे त्याला पिडीताचे कुटंुबीय, नातेवाईकांनी आसरा दिला होता.