धुळे महापौरपदी ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप कर्पे यांची निवड

0
75

धुळे, प्रतिनिधी । येथील महापालिकेवर भाजपने निर्विवाद वर्चस्व कायम राखले असून महापौरपदी ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप कर्पे यांची निवड झाली. जळगावची पुनरावृत्ती धुळ्यात करण्याचा विरोधकांचा दावा फोल ठरला.

शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने ही निवड प्रक्रिया पार पडली. महापालिकेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता ऑनलाइन सभा झाली. जिल्हाधिकारी जलज शर्मा अध्यक्षस्थानी होते. सभेत सर्व ७३ नगरसेवक सहभागी झाले. महापौर पदाची निवड बिनविरोध होऊ नये यासाठी विरोधी पक्षाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी दाखल केली होती. या शिवाय एमआयएमनेही उमेदवारी अर्ज भरला होता. यात भाजपच्या प्रदीप कर्पे यांना सर्वच्या सर्व ५० नगरसेवकांनी मतदान केले. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या तथा काँग्रेसच्या नगरसेविका मदिना पिंजारी यांना केवळ १७ मते मिळाली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला आव्हान देऊ असे म्हणणारी शिवसेना तटस्थ राहिली. शिवसेनेच्या उमेदवार ज्योत्स्ना पाटील यांनी उमेदवारी अर्जही मागे घेतला. एमआयएमने वेगळी चूल मांडली. त्यांच्या उमेदवार अन्सारी सईदा म. इकबाल यांना ४ मते मिळाली. बसपाच्या एकमेव नगरसेविका तटस्थ होत्या. महापौरपदाच्या निवडीत भाजपच्या नगरसेवकांनी दमण येथून सहभाग घेतला. महापौरपदाची माळ कर्पेंच्या गळ्यात पडताच दमण आणि महापालिकेच्या आवारात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. दरम्यान, भाजपचे अनेक नगरसेवक संपर्कात असल्याचा महाविकास आघाडीचा दावा फोल ठरल्याचे या निवडीनंतर दिसून आले.

पक्षश्रेष्ठीमुळे महापौरपदावर काम करण्याची संधी मिळाली. सर्व नगरसेवकांचे सहकार्य लाभले. आता शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न होतील. विकास योजनांचा आढावा घेऊन कामे लवकर मार्गी लावली जातील. देवपूर परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यास प्राधान्य असेल. स्वच्छता व आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष दिले जाईल, असे महापौर प्रदीप कर्पे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here