जळगाव : प्रतिनिधी
येथील रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर एका २५ ते ३० वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेखाली आल्याने चिरडून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. दरम्यान, मृत तरुणाचे ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलीसांनी केली असून याबाबत लोहमार्ग पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, येथील रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ च्या डाऊन साईडवरील रेल्वेलाईन वरील खंबा क्र.४१९/१७ ते ४१९/१९ दरम्यान एका २५ ते ३० वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेखाली आल्याने त्याच्या चेहर्याचा चेंदामेंदा होऊन तो जागीच गतप्राण झाला. सदर घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. मयत तरुणाची ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलीसांनी केले असून तरुणाचे वर्णन असे की, शरीर मध्यम बांधा, हातावर ॐ गोंधलेले असून डाव्या हाताच्या पंजावर राम गोंधलेले आहे. गळ्यात तुळशीची माळ, पिवळ्या रंगाचा शर्ट, जीन्स पॅन्ट असे वर्णन असून मयत तरुणाची ओळख असलेल्यांनी ओळख पटविण्याच्या कामी जळगाव लोहमार्ग पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोहेकॉ रविंद्र ठाकुर यांनी केले आहे.