पहुर. ता.जामनेर, प्रतिनिधी । पहुर पोलिस ठाण्याबाहेर असलेल्या चहाच्या टपरीवाल्यामार्फत म्हशीची गाडी सोडण्यासाठी त्याच्या अकाऊंट वर आलेले २ लाख रुपये तसेच सबंधित पोलिस अधिकारी यांच्या शी झालेला संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे जिल्हा पोलिस दलात तसेच इतरत्रही एकच खळबळ उडाली.
या दोन लाखाच्या स्विकारलेल्या लाचेमुळे पहुर पोलिस चांगलेच अडचणीत आले. या प्रकरणाची जिल्हा पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रविण मुंढे यांनी गंभीर दखल घेऊन या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश डीवायएसपी कैलास गावडे यांना दिले.
आज दि.१५रोजी दुपारी चाळीसगाव विभागाचे डीवायएसपी कैलास गावडे हे त्यांच्या पथकासह पहुर पोलिस ठाण्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी चहावाला गोपाल आस्कर ,पो.काँ.अमोल कुमावत, शेख अमिन,शेख अझरुद्दीन,आत्माराम तेले(धनगर)यांची चौकशी करून जबाब नोंदविला. पहुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे हे त्यांच्या अगोदर नियुक्ती असलेल्या एका प्रकरणात चौकशी साठी डीआयजी कार्यालय नाशिक येथे गेल्या मुळे त्यांची चौकशी झाली नाही. उद्या चाळीसगाव येथे बोलाऊन त्यांचा जबाब नोंदवून अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रविण मुंढे यांच्या कडे सोपविण्यात येईल अशी माहिती तपासाधिकारी डीवायएसपी कैलास गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.