देऊळवाडे येथील विकासकामांचे लोकार्पण व भूमिपुजन

0
7

जळगाव प्रतिनिधी । ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना अतिशय उत्तम असून देऊळवाडेकरांनी याच्या माध्यमातून एकजुटीचे दर्शन घडविले आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून गावातील एकोप्याला चालना मिळत असल्याने इतर गावांनी देखील याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील देऊळवाडे येथील गणरायाची आरती केल्यानंतर बोलत होते.
दरम्यान, पालकमंत्र्यांच्याच हस्ते गावातील विविध विकासकामांचे भूमिपुजन व लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना देऊळवाडेत आधीच विकासकामे सुरू असून लवकरच उर्वरित कामांना गती देण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.याबाबत वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील देऊळवाडे येथील ग्रामस्थांनी ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेच्या अंतर्गत गावामध्ये एकाच गणरायाची स्थापना केली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या मंडळाला भेट देऊन गणरायाची आरती केली. याप्रसंगी प्रारंभी ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्र्यांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. आरती झाल्यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण व भूमिपुजन करण्यात आले.

ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी देऊळवाडे गावात विविध कामांना गती मिळाली आहे. यात शाळा खोलीचे बांधकाम- ८ लक्ष रूपये; शाळेला संरक्षक भिंत- ७ लक्ष रूपये; चावडी चौकात पेव्हर ब्लॉक बसविणे-३ लक्ष रूपये; सौर उर्जेवर चालणारा दुहेरी पंप योजना ; व्यायामशाळेचे बांधकाम-१० लक्ष रूपये आदी कामे मंजूर करण्यात आली आहेत. यातील शाळा खोलीचे काम व संरक्षक भिंतीसह सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप योजनेचे लोकार्पण करण्यात आले. तर, उर्वरित कामांचे भूमिपुजन करण्यात आले. तसेच शाळा व परिसरात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण ही करण्यात आले. विशेष म्हणजे हा कार्यक्रम भर पावसात झाला. यावेळी शेकडो महिला व ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here