जळगाव : प्रतिनिधी
शहरातील पत्रकार भवनाच्या शेजारील जे.पी. शूज नावाचे दुकान फोडत चोरट्यांनी २४ हजाराची रोकड लांबविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजकुमार शंकरलाल नथाणी (रा.पाचोरा, ह.मु. रॉयल पॅलेसच्या मागे, जळगाव) यांचे मालकीचे जे.पी. शूज हे दुकान तहसिल कार्यालयालगत पत्रकार भवनाच्या शेजारी आहे. नाथाणी हे नेहमीप्रमाणे शनिवारी दुकान बंद करून गेले होते. काल मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास ५ ते ६ अज्ञात चोरट्यांनी दुकानासमोरील सीसीटीव्हीचे कॅमेरे तोडल्यानंतर दुकानाच्या शटरचे सेंटर लॉक व आजुबाजूचे दोघे कुलूपे कटरच्या सहाय्याने कापले. त्यानंतर शटर उघडून दुकानामधील ड्रॉवर फोडून त्यातील २४ हजाराची रोकड लांबविली. चोरट्यांनी परत जात असतांना दुकानातील सीसीटीव्हीचा सीडीआर बॉक्ससुध्दा लांबविला आहे. दरम्यान, चोरट्यांचा हा सर्व प्रताप नाथाणी यांच्या दुकानाच्या समोर असलेल्या त्यांच्या दुसर्या दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. मात्र या चोरट्यांनी आपल्या चेहर्यावर पूर्णपणे रुमाल बांधला असल्यामुळे त्यांचे चेहरे यात दिसत नाहीत. दरम्यान, आज पहाटेच्या सुमारास या परिसरात ये-जा करणार्या नागरीकांना सदर दुकानाचे शटर अर्धवट उघडे असल्याचे दिसले. हा प्रकार कर्तव्यदक्ष नागरिकांनी तत्काळ दुकान मालक राजकुमार नथाणी यांना कळविला. नथाणी यांनी तत्काळ दुकानाकडे धाव घेतली व सदर घटनेबाबत शहर पोलीसांना कळविण्यात आले. पोलीस स्थानकाने पो.नि. धनंजय हिरोळे यांनी आपल्या सहकार्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहोचत चोरीची माहिती जाणून घेतली. श्वान पथकास पाचारण केले असता श्वानाने रेल्वे लाईन ओलांडून ममूराबाद रस्त्याकडचा मार्ग दाखविला आहे. तर ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून चोरट्यांचे ठसे घेण्याचे काम सुरु होते. याबाबत राजकुमार शंकरलाल नथाणी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात ५ ते ६ चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ अक्रम शेख हे करीत आहे.