दिव्यांगाना साहित्य वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद- बच्चू कडू

0
38

जळगाव, प्रतिनिधी । मानवी सेवेत ताकद असल्याने समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी प्रत्येकाने नेहमीच मदतीचा हात दिला पाहिजे. सामाजिक कार्याने प्रेरित संघटनेने दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य वितरणाचा कार्यक्रम अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केले.

चाळीसगाव जि. जळगाव येथे आज सायंकाळी वर्धमान धाडीवाल मित्र मंडळातर्फे दिव्यांग बांधवांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिव्यांग संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी निकम, अनिल चौधरी, सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले, समाजातील वंचित, दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांना सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांनी मदतीसाठी पुढे आले पाहिजे. एवढेच नव्हे, तर मानवता धर्म मानून दिव्यांग बांधवांना मदत करावी. विविध मंडळांच्या माध्यमातून गरजू, दिव्यांग, निराधार व्यक्ती, गरीब रुग्णांना वेळोवेळी मदत करण्याचे आवाहन राज्यमंत्री श्री. कडू यांनी केले.

श्रीमती निकम म्हणाल्या, की, जळगाव जिल्ह्यात दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आगामी काळात विविध कार्यक्रम आयोजित केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

लक्ष्मण शिरसाट यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोना विषाणूच्या काळात बाधित रुग्णांना भोजन दिल्याबद्दल गणेश गवळी, विजय गवळी यांचा तसेच दिव्यांग बांधवांसाठी अहोरात्र झटणा-या मीनाक्षी निकम यांचा राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दिव्यांग बांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here