दांपत्याची पुन्हा दिलजमाई ; संसाररथ पुन्हा रुळावर

0
9

भुसावळ ः प्रतिनिधी
भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा एक संसाररथ मार्गावर आणला आहे. समुपदेशाने घटस्फोटाचा विचार रद्द करुन विभक्त होण्याच्या मार्गावरील दांम्पत्य यामुळे एकत्र आले.
आसोदे येथील भूषण चिरमाडे व गोजेरे येथील कीर्ती उर्फ भारती यांचा २०१८ मधे विवाह झाला. विवाहानंतर एक वर्ष सर्वकाही सुरळीत होते. पण हळूहळू त्यांच्यात वादविवाद सुरू झाले. याच दरम्यान दोघांच्या संसारात एक फुलही उमलले. लहानसहान भांडणाचे रूपांतर मोठ्या वादात झाल्याने, कीर्ती बाळाला घेऊन माहेरी गोजोरे येथे आली. काही दिवसांनी भुसावळ येथील भोरपंचायत कार्यालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. परंतू समुपदेशन कक्षात कीर्ती व भूषण या दोघांचे आधी वैयक्तिक व नंतर एकत्र समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर दोघांनी घटस्फोटाचा विचार रद्द करुन एकत्र संसार करण्याची इच्छा व्यक्त केली. गुढीपाडव्याच्या दिवशीच किर्ती व भुषण पुन्हा एकत्र आले. त्यानंतर कीर्ती सासरी नांदायलाही गेली. भोरगाव लेवा पंचायतीचे सचिव डॉ. बाळू पाटील व अध्यक्ष ऍड. प्रकाश पाटील यांनी पुढाकार घेऊन सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून दिली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भुसावळ शाखेचे अध्यक्ष ऍड.प्रकाश पाटील, सचिव डॉ. बाळू पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, समुपदेशन कक्षाच्या चेअरमन आरती चौधरी, सदस्या मंगला पाटील व जयश्री चौधरी यांच्या उपस्थितीत किर्तीची सासरी पाठवणी करण्यात आली. किर्ती व भूषणला सर्व सदस्यांनी आशिर्वाद दिले. भोरगाव लेवा पंचायतीने विस्कटण्याच्या मार्गावरील अनेक संसार पुन्हा फुलवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here