जळगाव ः प्रतिनिधी
रविवारी मध्यरात्रीनंतर मृत झालेल्या ११ वर्षीय मुलीचा मृतदेह आज सकाळी कबरीतून काढून शवविच्छेदन करण्यात आले.या घटनेने पिंप्राळा परिसरात एकच खळबळ उडाली असून हा चर्चेचा विषय ठरला आहे.ही मुलगी अपशकुनी आहे या समजातून तिचा सातत्याने छळ करणार्या सुशिक्षित बापानेच तिला मारले असावे, असा संशय त्या मुलीच्या मामाने एका अर्जाद्वारे पोलिसांकडे व्यक्त केल्याने पोलिसांनी हे पाऊल उचलले असून शवविच्छेदन अहवालानंतर कारवाईबाबत पोलिस निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे.
पिंप्राळातील हुडको वसाहतीत तीन महिन्यांपूर्वीच राहायला आलेल्या जावेद अख्तर शेख या केमिस्टचे काम करणार्या तरुणाची ही मुलगी आहे. तिचा एक काका डॉक्टर तर दुसरा वकील आहे. तिच्या जन्मानंतर काही दिवसांत जावेदच्या आईचे निधन झाल्याने कनीज फातेमा नावाची ही मुलगी कुटुंबासाठी अपशकुनी आहे, असा समज होऊन जावेदने तिचा छळ सुरू केला होता, असे तिचा मामा व तक्रारदार अजहर अली शौकत अली ( रा.अमळनेर) यांचे म्हणणे आहे. ती दोन वर्षांची असताना जावेदच्या मेडिकल स्टोअरला आग लागून त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. तेव्हापासून छोट्या कनीजचा जास्तच छळ त्याने सुरू केला. हा छळ सहन न झाल्याने कनीजच्या नाना-नानीने तिला आपल्या घरी नेले. तरीही तिला भेटण्याच्या निमित्ताने तिचे आई-वडिल त्यांच्या घरी जात व काही दिवसांसाठी म्हणून तिला घरी आणून पुन्हा तिचा छळ करीत,असे अर्जात म्हटले आहे.
तीन महिन्यापूर्वीच जावेदने आपले कुटूंब अमळनेरमधून जळगावात हलवले. शहरातील पिंप्राळा भागातील हुडकोत ते राहत होते. २५ एप्रिलच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास जावेदने घरमालक आरीफ खान यांना झोपेतून उठवले आणि आपल्या मोठ्या मुलीचे निधन झाल्याचे त्यांना सांगितले. सकाळी तिचे काका घरी आले. त्यांच्यासह परिसरातील मोजक्या लोकांनीच कब्रस्तानात जाऊन तिचा दफनविधी केला.त्यानंतर हे कुटुंबीय दुसर्याच दिवशी रावेरला जाऊन येतो असे सांगून निघून गेले. हा प्रकार आजूबाजूच्या मंडळींना संशयित वाटल्याने खटकला. त्यामुळे त्यांनी कनीजच्या नानांना फोन करून कनीजच्या मृत्यूची माहिती दिली. ते कुटुंबासह तातडीने जळगावमध्ये आले. त्यानंतर कनीजच्या मामाने सोमवारी पोलिसांत अर्ज दिला. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला.
तहसिलदार आणि वैद्यकिय अधिकारी यांच्या उपस्थितीत आज सकाळी कब्रस्तानात जाऊन कनीजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तिथेच शवविच्छेदन करण्यात आले असून त्याच्या अहवाल काय येतो हे पाहून निर्णय घेण्यात येणार आहे, असे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी सांगितले.