जळगाव ः प्रतिनिधी
कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक असताना अजूनही अनेक जण ते पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन लावण्याबाबत प्रशासन गांभीर्याने विचार करीत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी काल सांगितले. अर्थात, लॉकडाऊनचा निर्णय अचानक घेतला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, शुक्रवारपासून शहरात रुग्ण शोधण्यासाठी मोहीम सुरू होत असून त्याला नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची भूमिका आणि योजण्यात येत असलेले उपाय या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी राऊत यांनी काल पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुळकर्णी, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते. त्यांनीही पोलिस व पालिकेची भूमिका स्पष्ट केली.
सार्वजनिक होळी नाही
कोरोनाच्या काळात प्रत्येक सण, उत्सवावर बंदी असून होळी आणि धुलीवंदन हा सण सार्वजनिकरित्या साजरा करू नये, असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले. राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुढील आदेश देण्यात येईल. एकूण परिस्थिती पाहता तीन दिवसाच्या लॉकडाऊनबाबत विचार सुरू असून आदेशपूर्वी नागरिकांना पुरेसा वेळ दिला जाईल. लॉकडाऊनची वेळ येऊ नये यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
गृह विलगीकरणासाठी कक्ष तयार
शहरात पिंप्राळा, खोटेनगर, कांचननगर, अयोध्यानगर, गणेश कॉलनी, शिवकॉलनी भाग हॉटस्पॉट झाला आहे. वाढती रुग्णसंख्या बघता गृह विलगीकरणाच्या नियमात बदल केले असून परवानगीसाठी मनपाच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांनी योग्य माहिती देऊन पूर्व परवानगी घेतल्याशिवाय घरी राहू नये, असे आयुक्त कुळकर्णी म्हणाले.
महिलेसह तीन जणांंचा मृत्यू
जळगाव शहरात गुरुवारी २७४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर दिवसभरात ३५ वर्षीय महिलेसह तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच बुधवारी ४२८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरात गुरुवारी आरटीपीसीआर चाचणीद्वारे ११६ तर अँटिजेन चाचणीद्वारे १५८ असे एकूण २७४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.दुसर्या लाटेत तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. सध्या शहरात २ हजार ८५० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
पोलिसांसाठी कोविड केअर सेंटर
कोरोनाची स्थिती आणखी बिकट होऊ नये, म्हणून पोलिस प्रशासनातर्फे नियमांचे उल्लंघन करणार्यांवरील कारवाईचा वेग वाढवला जाणार आहे. तीन दिवस लॉकडाऊनसाठी पोलिस प्रशासन सज्ज असून, प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळावी, असे पोलिस अधीक्षक डॉ. मुंडे म्हणाले. पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ४० बेडचे कोविड केअर सेंटर आज शुक्रवारपासून पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.
पथकांना सहकार्य करा
जिल्ह्यात प्रत्येक तालुकानिहाय १ हजार नागरिकांपर्यंत रुग्ण शोधपथक पोहोचत आहे. तालुक्यात अंगणवाडी सेविका, अशा वर्कर्स, शिक्षक आदी आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करत आहेत. मोहिमेदरम्यान आपल्याकडे येणार्या आरोग्य कर्मचार्याला आजाराबाबत योग्य ती माहिती द्यावी, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी दिली.
शहरात आजपासून रुग्ण शोधमोहीम
कोरोनाची वाढती संख्या बघता मनपा हद्दीत मनपाचे दहा हेल्थ सेंटर कार्यान्वित असून, या माध्यमातून रुग्ण शोधमोहीम शुक्रवारपासून (दि.२६) सुरू करण्यात येत आहे. या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी केले. शहरात अनेक नागरिक मास्क वापरत नाहीत, तसेच फिजिकल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाईसाठी मनपाची चार पथके कार्यरत आहेत.