मुंबई, वृत्तसंस्था । तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचं निधन झालं आहे.
तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचं निधन झालं आहे. दुर्घटनेत जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर बंगळुरु येथील कमांड रुग्णालयात उपचार सुरु होते. दुर्घटनेत संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांच्यासह इतर १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला होता.
यावेळी फक्त वरुण सिंग दुर्घटनेतून बचावले होते. ते लवकर बरे व्हावेत यासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना केली जात होती. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान बधुवारी त्यांचं निधन झालं.
तमिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला. या दुर्घटनेत वरुण सिंग गंभीर जखमी झाले होते. ते जवळपास ४५ टक्के भाजले होते. त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. ज्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथे सीडीएस बिपिन रावत व्याख्यानासाठी गेले होते, त्याच सुलूर हवाई तळावर वरुण सिंग विंग कमांडर होते.
ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असल्याचं भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी १२ डिसेंबरला सागितलं होतं. “वरुणच्या तब्येतीत चढ-उतार होत आहेत, परंतु एक सैनिक असल्याने तो ही लढाई जिंकेल, असा मला विश्वास आहे,” असं भोपाळ येथे राहणारे त्यांचे निवृत्त वडील कर्नल केपी सिंग पीटीआयशी बोलताना सांगितलं होतं.
सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा, उत्तम तज्ज्ञ त्याच्यावर उपचार करत आहेत. संपूर्ण देश त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. त्याला ओळखत नसलेले किंवा सेवानिवृत्त झालेले किंवा सेवा देणारे बरेच लोक भेटायला आले आहेत. अनेक महिला देखील त्याला भेटायला येत आहेत, हे सर्व पाहून मी भावूक झालो आहे. तो एक सैनिक आहे आणि तो लवकरच ही लढाई जिंकून बाहेर येईल,” असे केपी सिंग म्हणाले होते. मात्र दुर्दैवाने बुधवारी वरुण सिंग यांची मृत्यूसोबची झुंज अपयशी ठरली.
शौर्यचक्राने करण्यात आला होता सन्मान
एक वर्षापूर्वी वरुण सिंग उड्डाण करत असलेल्या एका लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टच्या सिस्टीममध्ये बिघाड झाला होता, परिणामी त्यांनी एअरक्राफ्टवरील नियंत्रण पूर्णपणे गमावले होते. मात्र, मोठ्या हिमतीने त्यांनी विमान उतरवण्यात यश मिळवले होते.