जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील शिरसोली नजीक दापोरे येथील २७ वर्षीय तरुणाने बाहेरुन फिरुन येतो असे सांगत घरातून निघून जात रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील शिरसोलीनजीक दापोरा येथील विशाल शांताराम पवार (वय २७) हा तरुण आई व बहिणीसह रहिवासाला आहे. विशाल हा शिक्षण करीत असतांना आईसोबत मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मागील बर्याच दिवसांपासून तो कर्जबाजारीपणामुळे तणावात असल्याचे ग्रामस्थांच्या चर्चेतून समजते. काल सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आईला तो म्हणाला की, जरा मी बाहेरुन जावून येतो असे म्हणत तो दुचाकी घेवून तो घराबाहेर पडला. शिरसोली ते दापोरे दरम्यानच्या परिसरात त्याने आपली दुचाकी लावून दिली व समोरुन येणार्या धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. सदर घटना कर्तव्यावर असलेल्या गँगमन पांडे यांनी रेल्वे स्टेशन मास्तर यांना कळविली. रेल्वे स्टेशन मास्तर यांनी सदर माहिती पोलीस स्थानकाला कळविली. यावेळी तालुका व एमआयडीसी पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताच्या खिशातील कागदपत्रांमुळे त्याची तत्काळ ओळख पटली. जिल्हा शासकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करुन तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.