जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील ख्वाजामियाँ चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील अतिक्रमीत हॉटेल हटविण्याचे आदेश महापौर भारती सोनवणे यांनी बुधवारी दिले. शिवसेनेचे माजी महानगराध्यक्ष गजानन मालपुरे यांनी यासंदर्भात महापौर सोनवणे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत महापौर सोनवणे यांनी हे आदेश दिले.
अस्वच्छतेच्या तक्रारी वाढल्याने महापौर भारती सोनवणे यांच्याकडून शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. बुधवारी प्रभाग ७, ८, ९ मध्ये पाहणी दौरा करण्यात आला. या पाहणी दौर्याच्या सुरुवातीलाच महापौर सोनवणे यांनी ख्वाजामियाँ चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बांधण्यात आलेल्या अतिक्रमित हॉटेलची पाहणी केली. यावेळी महापौरांनी अतिक्रमण निर्मुलन विभागाला तात्काळ हॉटेल हटविण्याचे आदेश दिले. दरम्यान, हॉटेल चालकाने ७ दिवसाची मुदत मागितली. सात दिवसात अतिक्रमण न काढल्यास जेसीबीद्वारे हॉटेल पाडण्याचा इशाराही महापौरांनी यावेळी दिला.


