मुंबई : प्रतिनिधी
राज्यात कोरोना संकटाच्या (Corona crises) पार्श्वभूमीवर अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे . ठाकरे सरकारकडून (Thackeray Govt) बेरोजगारांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये ऑगस्ट-२०२१ मध्ये १७ हजार ३७२ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली.
यात मुंबई विभागात सर्वाधिक ६ हजार १९०, नाशिक विभागात २ हजार १६८, पुणे विभागात ४ हजार ६२९, औरंगाबाद विभागात ३ हजार ७३८, अमरावती विभागात ४४९ तर नागपूर विभागात १९८ इतके जण नोकरीला लागले आहेत.
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. या अंतर्गत बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. बेरोजगार उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. कारण कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हेसुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधतात. विभागाकडून आतापर्यंत महास्वयम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९१ हजार ९१ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. याद्वारे अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून बेरोजगारांसाठी हे चांगले व्यासपीठ आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली .
दरम्यान मुंबईमध्ये ऑगस्ट २०२१ मध्ये विभागाकडे ३९ हजार ५७४ इतक्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ९ हजार २१६, नाशिक विभागात ६ हजार १८०, पुणे विभागात १० हजार ९८०, औरंगाबाद विभागात ८ हजार १०९, अमरावती विभागात २ हजार ७४० तर नागपूर विभागात २ हजार ३४९ नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी नोदणी केली आहे.