यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील किनगाव नजीक पपईची वाहतूक करणारे आयशर ट्रक पलटी होत झालेल्या अपघातात १५ मजुरांचा जागीच गुदमरुन मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात सहा जण गंभीर जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. या अपघातात मृत मजुरांमध्ये रावेर तालुक्यातील आभोडा येथील ११, विवरा, रावेर, केर्हाळा येथील ४ असे एकूण १५ जणांचा समावेश आहे. अपघातातील मृतांमध्ये आभोडा येथील एकाच कुटुंबातील ११ जणांचा समावेश असून त्यात दोन बालक तर सहा महिलांमध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. यावल तालुक्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी दुर्दैवी घटना असल्याने संपूर्ण यावल रावेर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील नेर कुसुंबा येथून आयशर ट्रक (क्र.एमएच-१९ झेड ३५६८) पपई भरून यावलकडे येत असताना बर्हाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावर चोपडा ते यावल दरम्यान किनगावनजीक हॉटेल मन मंदिर जवळील वळणावर आयशर ट्रकचा गुल्ला तुटल्याने ट्रकवरील वाहनचालकाचा ताबा सुटला. यात आयशर ट्रक पलटी झाला. या अपघातात ट्रकमध्ये पपईंसोबत बसलेले मजूर पपयांच्या ढिगार्याखाली दाबले गेले. हा अपघात भयंकर भीषण झाला. या अपघातात पंधरा जण जागीच ठार झाले तर सहा जण जखमी झाले. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. या अपघातात ट्रक ड्रायव्हर शेख जहीर शेख बदरुद्दीन (रा.मोमिनपुरा ता. रावेर), बाबा इरफ़ान शहा फकीर वाडा (रा.रावेर), रमजान मोहम्मद तडवी (रा.आभोड़ा ता.रावेर) हे बचावले आहेत. दरम्यान, आयशर ट्रक चालक शेख जहीर शेख बदरुद्दीन यास यावल पोलीसांनी ताब्यात घेतले आहे तर मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. दरम्यान, मध्यरात्री झालेल्या अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, यावल पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. यांच्यासोबत पीएसआय अफजलखान पठाण, सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, हवालदार पाचपोळ आदी होते. पलटी झालेला ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आला त्यानंतरच मजूरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
अपघातात मृतांची नावे पुढीलप्रमाणे शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार (वय ३०, रा.फकिरवाडा, रावेर), सरफराज कासम तडवी (वय ३२, रा.केर्हाळा, ता.रावेर), डिगंबर माधव सपकाळे (वय ५५, रा. रावेर) यांच्यासह नरेंद्र वामन वाघ (वय २५, रा.आभोडा), दिलदार हुसेन तडवी (वय २०, रा.आभोडा), संदिप युवराज भालेराव (वय २५, रा.विवरा), अशोक जगन वाघ (वय ४०, रा.आभोडा), दुर्गाबाई संदीप भालेराव (वय २०, रा.आभोडा), गणेश रमेश मोरे (वय ५, रा.आभोडा), सागर अशोक वाघ (वय ३, रा.आभोडा), शारदा रमेश मोरे (वय १५, रा.आभोडा), संगिता अशोक वाघ (वय ३५, रा.आभोडा), सुमनबाई शालिक इंगळे (वय ४५, रा.आभोडा), कमलाबाई रमेश मोरे (वय ४५, रा.आभोडा), सबनूर हुसेन तडवी (वय ५३, रा.आभोडा) असे एकूण पंधरा जण अपघातात जागीच ठार झाले.
घटनेचे वृत्त कळताच घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी भेट दिली असून येथील ग्रामीण रुग्णालयात प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी भेट देत अपघाताची माहिती जाणून घेतली. दरम्यान, घटनेचे वृत्त जिल्ह्यात वार्यासारखे पसरले. यानंतर यावल ग्रामीण रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांचे सात्वंन करण्यासाठी पंचायत समितीचे सभापती दिपक पाटील, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, यावलचे काँग्रेसचे शहराध्यक्ष कादीर खान यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या भिषण अपघाताने यावल रावेर तालुक्यात सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
