झंवरच्या कार्यालयात आढळून आले आ. भोळेंचे कोरे लेटरपॅड

0
21

जळगाव ः प्रतिनिधी

बीएचआर घोटाळ्यात अटकेत असलेल्या सुनील झंवरचा मुलगा सूरज गेल्या दहा दिवसांपासून पोलिस कोठडीत होता. सूरजकडून मिळालेली महत्त्वाची कागदपत्रे, माहितीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, आमदार सुरेश भोळे यांचे कोरे लेटरपॅड झंवरच्या कार्यालयात मिळून आल्याची बाब समोर आली आहे.

 

बीएचआर घोटाळाप्रकरणी पुण्यात दाखल तीन गुन्ह्यांपैकी डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सूरज झंवर याला २२ जानेवारी रोजी जळगावातून अटक करण्यात आली. यानंतर न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी सूरजला मंगळवारी न्यायालयात हजर केलेे. सूरज याच्याकडून गुन्ह्याशी संदर्भात अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र, पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. संशयित आरोपी सुनील झंवर, जितेंद्र कंडारे, कृणाल शहा, महावीर जैन, वाणी यांच्यासोबत सूरजनेही साई मार्केटिंगच्या कार्यालयात मीटिंग घेतलेल्या आहेत. सूरजच्या लॅपटॉपमध्ये बीएचआरची बनावट बेवसाइटदेखील आढळून आली आहे. सूरजच्या कार्यालयात आढळलेल्या मालमत्तांच्या फायलींवरील स्वाक्षरी, साई मार्केटिंगमधील भागीदारी असल्याचे त्याने कबूल केले आहे. तसेच झंवर याच्या पुण्यातील फ्लॅटमध्ये आठ पिशव्यांमध्ये शेकडो कागदपत्र मिळाले आहे. यात जळगावचे आमदार सुरेश भोळे यांच्या नावाचे कोरे लेटरपॅडदेखील आहे. या शिवाय काही कर्जदारांची प्रकरणे, राजपत्रित अधिकार्‍यांच्या नावाच्या शिक्क्यांचा समावेश आहे. पोलिस कोठडीत असताना ही महत्त्वाची कागदपत्र मिळून आल्याच्या बाबतीत सूरजने होकारार्थी उत्तरे दिली आहेत. दरम्यान, काल सूरज झंवर याला पुणे न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी सरकार पक्षाने दोन दिवस पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यावर युक्तिवाद होऊन सुनावणीअंती न्यायालयाने सूरज याला न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे ऍड. प्रवीण चव्हाण, ठेवीदारांतर्फे त्रयस्थ अर्जदार ऍड. अक्षता नायक तर झंवर याच्यातर्फे ऍड. तोतला व हर्षद निंबाळकर यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here