ज्येष्ठ नेते, पुरोगामी विचारवंत प्रा. एन डी पाटील यांचं निधन

0
29

ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे लढवय्ये नेते प्रा. एन. डी .पाटील (N D Patil) यांचे आज वृद्धापकळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एन डी पाटील यांच्या निधनामुळं सर्वसामान्यांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

वातावरणातील बदलामुळे एन. डी. पाटील यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथं उपचारादरम्यान त्यांना दोन ब्रेन स्ट्रोक येऊन गेले. त्यामुळे त्यांचे बोलणेही बंद झाले होते. मागच्या दोन चार दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नपाणी देखील गेलेले नव्हते. ते उपचारासही फारसा प्रतिसाद देत नव्हते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्याला यश आलं नाही.

एन डी पाटील यांचा जीवनप्रवास

सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) इथं जन्मलेल्या एन डी पाटील यांचे संपूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील. मात्र, संपूर्ण महाराष्ट्राला ते एन डी पाटील याच नावानं परिचित होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एनडींनी अर्थशास्त्रात एमए केल्यानंतर पुणे विद्यापीठातून एलएलबीची पदवी घेतली. त्यानंतर ते अध्यापन क्षेत्रात कार्यरत होते. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ व रयत शिक्षण संस्थेत त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती. राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. १९४८ साली शेतकरी कामगार पक्षात त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर पक्षाच्या सरचिटणीस पदापर्यंत मजल मारली. तब्बल १८ वर्षे ते महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सदस्य होते. १९७८ ते १९८० या काळात त्यांनी राज्याचे सहकार मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. राज्य विधानसभेत त्यांनी कोल्हापूरचे प्रतिनिधित्व केले होते. राज्यात १९९९ साली आलेल्या लोकशाही आघाडी सरकारचे ते निमंत्रक होते. विधिमंडळाचे सदस्य म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी पोटतिडिकीने मांडले. लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असे. सीमाभागातील मराठी भाषिकांविषयी एन डी पाटील यांना प्रचंड आस्था होती. त्या चळवळीत ते अखेरपर्यंत सक्रिय होते. सीमा भागातील मराठी भाषिकांना त्यांना मोठा आधार वाटे. एन डी पाटील देखील सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात सातत्यानं आवाज उठवत. त्याशिवाय, लोकांसाठी झालेल्या अनेक लढ्यांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here