जळगाव : प्रतिनिधी
शहरातील जोशी पेठ, भवानी पेठ, बागवान मोहल्ला, खाटीक वाडा, पतंग गल्ली आदी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी मनपा आयुक्तांनी या परिसरातील भागांची पाहाणी करून नागरीकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी या परिसरातील नागरीकांनी केली आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील जोशी पेठ, भवानी पेठ, बागवान मोहल्ला, खाटीक वाडा, पतंग गल्ली आदी परिसरात मोठ्या प्रमाणात गटारी तुंबल्या आहेत. तसेच कचराकुंड्यामधील कचरा रस्त्यावरच पडलेला असल्याने या परिसरातील नागरीकांना अशाच घाणीच्या साम्राज्यातून ये-जा करावी लागत आहे. नुकत्याच कोरोनाच्या लॉकडाऊननंतर शाळा सुरु झाल्या असून विद्यार्थ्यांनाही या दुर्गंधीयुक्त परिसरातून वापर करावा लागत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अशफाकभाई बागवान यांनी मनपा उपाआयुक्तांना याबाबत माहिती दिली होती. त्यांनी माहिती देतांना सांगितले की, १ फेब्रुवारीपासून मनपातर्फे आरोग्य साफसफाई मोहीम राबवली गेली मात्र या परिसरात घाणीचे साम्राज्य जैसे थेच असल्याने या सफाई मोहिमेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या दाट वस्तीच्या परिसरात गांभीर्याने लक्ष देवून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी केली आहे.