जे.के.पार्क अखेर मनपा प्रशासनाने घेतला ताब्यात

0
14

जळगाव ः प्रतिनिधी
कराराची मुदत संपलेल्या जे.के. पार्कची जागा ३० दिवसांत ताब्यात देण्याचे आदेश महापालिकेने दिले होते. मुदत संपल्यानंतरही जागेचा ताबा ठेवल्यामुळे मनपा उपायुक्त प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वात ३१ व्या दिवशी बुधवारी जे.के.पार्क मनपाने ताब्यात घेतले आहे तसेच मुदत संपल्यापासून ताब्यात ठेवल्याप्रकरणी जे.के. डेव्हलपर्सकडून नुकसान भरपाई वसूल केली जाणार आहे.
नगरपालिका असताना १९८९ मध्ये तत्कालिन मुख्याधिकार्‍यांनी जे.के. डेव्हलपर्स यांना शिवाजी उद्यानातील जागा स्वखर्चाने मिनी ट्रेन, मेन स्टेशन, मेरी गो राउंड, इलेक्ट्रीक झुला आदींसाठी ११५ बाय ९५ चौरस मीटर अर्थात १० हजार ९२५ चौरस मीटर जागेत बसवण्यासाठी करारनामा करून दिला होता. १९८९मध्ये करण्यात आलेल्या ३० वर्षांच्या करारनाम्याची मुदत १५ महिन्यांपूर्वी २६ डिसेंबर २०१९ रोजी संपली होती. यासंदर्भात स्थायी समिती व महासभेत विषय मांडून भाजप नगरसेवकांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने आता जे.के. डेव्हलपर्स यांना आदेश काढले आहेत.
मुदत संपल्यानंतरही जे.के. डेव्हलपर्स यांनी ती जागा महापालिकेकडे न सोपवता अनधिकृतपणे स्वत:च्या ताब्यात ठेवली. त्यामुळे ३० दिवसाच्या आत जागेचा ताबा महापालिकेकडे देण्याचे आदेश गेल्या महिन्यात बजावले होते. त्यात निष्कासीत करण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय २६ डिसेंबर २०१९ रोजी जागा महापालिकेच्या ताब्यात येईपर्यंत नुकसान भरपाईचा भरणा करण्याचे आदेशात म्हटले होते.
उपायुक्तांच्या नेतृत्वात पंचनामा
आदेशानंतर पंधरा महिने लोटले तरी जे.के. डेव्हलपर्स यांनी जागा महापालिका प्रशासनाच्या ताब्यात न दिल्याने अखेर ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता मनपाच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वात जे.के.डेव्हलपर्सकडील
जागेचा पंचनामा करण्यात आला.यादी तयार करून मिळकत सील करून मनपाच्या ताब्यात घेण्यात आली.याप्रसंगी प्रभाग अधिकारी बाळासाहेब चव्हाण, मिळकत व्यवस्थापक राजेंद्र पाटील,
करअधीक्षक नरेंद्र चौधरी उपस्थित होते. नवीन आर्थिक वर्षात आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी मालमत्ता व्यवस्थापन विभागाची निर्मिती केली आहे.या विभागामार्फत ही पहिलीच कारवाई आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here