जुन्या नगरपालिकेच्या जागेवरील मक्तेदार पार्किंगचा की अतिक्रमणांचा ?

0
10

जळगाव ः विशेष प्रतिनिधी
शहरात अतिक्रमण ही समस्या कधीही न संपणारी किंवा न सुटणारी आहे.महापालिकेचाअतिक्रमणविभाग त्यामुळे नेहमीच चर्चेत असतो.त्यांच्यावर हप्ते घेण्याचे आरोप सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी सभागृहात अनेकदा केले आहेत.हा अतिक्रमण विभागाचा भाग झाला पण आता महापालिकेकडून पार्किंग (वाहनतळ) चा ठेका घेतलेला मक्तेदारसुद्धा अतिक्रमणधारकांकडून दैनिक ३०० रुपये वसूल करीत असल्याचे धक्कादायक पण अधिकृत गोटातील वृत्त आहे.जुन्या नगरपालिकेच्या जागेवर हा प्रकार सर्रासपणे सुरू असून त्याकडे कर्तव्यदक्ष उपायुक्त संतोष बाहुळे यांनी लक्ष देण्याची मागणी आहे .
जळगाव शहरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात फोफावण्याचे मुख्य कारण म्हणजे खुद्द अतिक्रमण विरोधी पथकाचा नाकर्तेपणा.किंबहुना त्यांची हप्तेखोरी.हप्तेखोरीचा आरोप हा येथील लोकप्रतिनिधींचाच आहे हे विशेष.अतिक्रमण विभागाचे अतिक्रमण धारकांशी असलेले साटेलोटे व सलोख्याचे संबंध पाहता आणि खूप प्रयत्न करूनही ही समस्या सुटत नसल्याचे पाहता अथवा शहर अतिक्रमणमुक्त होत नसल्याने विभागाला ‘‘अतिक्रमण संवर्धन विभाग ‘‘असे नाव द्यावे असे नगरसेवक गमतीने म्हणू लागले आहेत.
परंतु,या विभागावर कडी करण्याचे काम वाहनतळ (पार्किंग) च्या मक्तेदारकडून होत असल्याचे वृत्त आहे.अतिक्रमण विभागाच्या अगदीच नाकावर टिच्चून किंवा त्यांच्याच समर्थनाने पार्किंगच्या ठेकेदाराने जुन्या पालिकेच्या जागेवरील म्हणा किंवा पार्किंगच्या चारी बाजूंच्या कंपाउंडला लागून लावल्या जाणार्‍या हातगाड्या ,खाद्य पदार्थांच्या गाड्या आदींकडून दररोज ३०० रुपयांची वसुली सुरू केली जात असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.उल्लेखनीय म्हणजे ज्यांच्याकडून वसुली होते त्यांना अतिक्रमण विभाग हात लावत नाही.त्यांना हटविण्याची कारवाई करीत नाही. यावरून त्या लोकांना पार्किंग ठेकेदाराकडून संरक्षण सुद्धा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.
जुन्या नगरपालिकेच्या बखळ जागेचा वापर वाहनतळ म्हणून केला जात आहे. महापालिकेच्याच सत्ताधारी गटाच्या कोण्या नगरसेवकाने नातलागच्या नावावर पेंड पार्किंगचा ठेका घेतल्याची माहिती मिळते.मध्यवर्ती भागात वाहन तळाची अशी सोय झाल्याने विशेष करून स्थानिकपेक्षा बाहेर गावच्या लोकांना आपले चार चाकी वाहन लावून निश्चिंतपणे शॉपिंगचा आनंद घेता येतो.त्यासाठी पाच -पन्नास रुपये मोजावे लागले तरी चालतात.त्या बद्दल कुणाची तक्रार,घेणेदेणे नाही.
परंतु पार्किंगचा हा ठेकेदार पार्किंग कंपाउंडला लागून असलेल्या मुख्य रस्ता म्हणजे महात्मा गांधी रोड, पूर्वेकडच्या वैभव कापड दुकानाची गल्ली,पोलीस स्टेशन लगतची लहान बोळ, आणि अगदी मागची बाजू या चारही बाजूंनी असलेल्या कंपाउंड ला लागून लावल्या जाणार्‍या वडापाव,दाबेली,पाणीपुरी,भेळपुरी,पान ठेला,सोयाबीन बिर्याणी,चहावाला, चप्पल व रेडिमेड कापड विक्रेते आदींकडून प्रत्येकी ३०० रुपये रोज वसुली करीत असल्याची तक्रार आहे.
त्यातील एका रोज ३०० रुपये देणार्‍या हातगाडी (खाद्य पदार्थ)विक्रेत्याने साईमत प्रतिनिधीला याबद्दल सविस्तर सांगितले.त्याच्या म्हणण्यानुसार ‘‘साहेब एक तर काम धंदे नाहीत.होते त्यांना कोरोना व लॉकडाऊनमुळे ब्रेक लागलेला.आता कुठे थोडेफार धंदे सुरू झाले आहेत आणि अतिक्रमण विभाग त्रास देतो.दुकान गाडी लावू देत नाही ‘‘ आम्ही आमचे व कुटुंबाचे पोट कसे भरणार? हा त्याचा प्रश्न .
‘‘त्यापेक्षा पार्किंग ठेकेदाराशी ठरवून येथे गाडी लावली तर धंदा होतो आणि विशेष म्हणजे अतिक्रमणवाले त्रास देत नाहीत.त्यापोटी ३०० गेले तरी चालतात भाऊ.‘‘जुन्या नारपालिका जागेवरील सध्याच्या पार्किंग कंपाउंडला लागून चोहोबाजूंनी जवळपास २०-२५ लहानसहान खाद्य पदार्थ, आदींचे ठेले-हातगाड्या लागतात.त्यांच्याकडून पार्किंग ठेकेदार बिनधास्तपणे पैसे वसूल करतो आहे.त्याबदल्यात त्यांना अतिक्रमण विभागाचे संरक्षणसुद्धा देतो आहे.हे सारे अनैतिक व अवैध असतांना राजरोसपणे चालते कसे ? हा ही प्रश्न आहे. लहान दुकानदार किती व काय कमावतो त्यापेक्षा त्याला पार्किंग ठेकेदाराला पैसे द्यावे लागतात हे महत्वाचे आहे.हे सारे खुलेआम व राजरोसपणे चालत असतांना प्रशासकीय यंत्रणा गप्प का ? की त्यांनाही ठेकेदार पैसे देतो?हा प्रश्न आहे.
आयुक्त सतीश कुलकर्णी ,उपयुक्त संतोष बाहुळे यांनी या गैरप्रकाराकडे लक्ष द्यावे ,प्रसंगी आपल्या अतिक्रमण विभागाचीच हजेरी घ्यावी,आणि पार्किंग मक्तेदाराची हप्तेखोरी,मनमानी,दादागिरी,दबंगगिरी ,भाईगिरी मोडून काढावी ,मक्तेदार जुमानत नसेल तर त्याचा मक्ता रद्द करण्यात यावा.प्रसंगी पोलिसांची मदत घ्यावी अशी कळकळीची मागणी तेथील लहान व हातावर पोट भरणार्‍या व्यावसायिकांची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here