जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा कारागृहातील १३ कैद्यांना कोरोनाची लागण झाली असून सर्वांना उपचारासाठी जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही या कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात २८५ नवे रुग्ण आढळून आले. शासकीय कार्यालय, रुग्णालयानंतर आता जिल्हा कारागृहामध्ये देखील कोरोनाने एन्ट्री केली. जिल्हा कारागृहामध्येदेखील काही कैद्यांना कोरोना आजाराची लक्षणे जाणवत होती. त्यामुळे जिल्हा कारागृह प्रशासनाने त्यांचे नमुने देऊन तपासणी करून घेतली होती. यात १३ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.



