जळगाव : प्रतिनिधी I जिल्ह्यात अवैधरित्या वाळूची तस्करी होत असून ती रोखण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी 11 वा. जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्याच्या विकासाकरिता 225 कोटी रूपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आले असल्याचेही ना. सत्तार यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभरात नियोजन मंडळाच्या बैठकी घेऊन विकास आराखड्याला मंजुरी देण्याच्या दृष्टीने सूचित केले होते त्यानुसार आज मी ऑनलाईन या बैठकीस उपस्थिती दिली असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना त्यांनी जळगाव जिल्ह्यातील वाळू तस्करीच्या वाढत्या तक्रारींबाबत शासनाने दखल घेतली असून मी आजच जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी वाळू तस्करी होत असेल त्या त्या ठिकाणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले.
राज्यात भविष्यात राष्ट्रवादी शिवसेना युती होणार का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत भाष्य करण्यास नकार दिला.ते म्हणाले की, हा माझ्या अखत्यारीतील विषय नाही. याबाबत पक्ष प्रमुखच अंतिम निर्णय घेऊ शकतात.