जिल्ह्यातील ऑटो रिक्षा इलेक्ट्रॉनिक फेअर मिटर रि-कॅलिब्रेशन” केंद्राचे उद्घाटन

0
14

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील रिक्षांची प्रवासी भाडे वाढवण्यास नुकतीच उप-प्रादेशिक परिवहन विभागाने मान्यता दिली आहे. दिनांक २० डिसेंबर २०२१ पासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु झाली आहे. जळगाव शहरातील रिक्षा संघटना व सामाजिक कार्यकर्ते श्री. दीपककुमार गुप्ता ह्यांचे मार्फत मा. जिल्हाधिकारी श्री. अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदना नुसार जळगाव जिल्ह्यातील ऑटो रिक्षा मधील इलेक्ट्रॉनिक फेअर मिटरचे रि-कॅलिब्रेशन (फेर-तपासणी) करण्यासाठी शहरात रि-कॅलिब्रेशन (फेर-तपासणी) केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.

त्याअनुषंगाने रिक्षा प्रवाश्यांकडून इलेक्ट्रोनिक रिक्षा मीटर द्वारे नियमानुसार योग्य भाडे आकारण्यासाठी मा. जिल्हाधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव या संस्थेला सदर प्रकारची तपासणी करण्यासाठी मान्यता देण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व पारवानाधारक रिक्षा चालकांनी इलेक्ट्रोनिक फेअर मिटरमध्ये त्वरित योग्य त्या सुधारणा करून ते रि-कॅलीब्रेट (फेर-तपासणी) करून घ्यावेत असे आदेशही मा. जिल्हाधिकारी ह्यांनी बैठकीत दिले.

त्यानुसार जिल्ह्यातील ऑटो रिक्षा मधील इलेक्ट्रॉनिक फेअर मिटरचे रि-कॅलिब्रेशन (फेर-तपासणी) करून ते जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना प्रमाणित करून देण्यासाठी रि-कॅलिब्रेशन (फेर-तपासणी) केंद्र शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव येथे सुरू करण्यात आले आहे. त्यास उपप्रादेशिक परिवहन विभागानेही नुकतीच मान्यता दिली आहे.

सदर केंद्राचे आज दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी शासकीय तंत्रनिकेतन जळगाव मधील यंत्र अभियांत्रिकी विभागात मान्यताप्राप्त “इलेक्ट्रोनिक ऑटो रिक्षा फेअर मिटर रि-कॅलिब्रेशन (फेर तपासणी) केंद्रा” चे उद्घाटन मा. श्री शाम लोही (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी) यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री. दीपककुमार गुप्ता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी मा. श्री शाम लोही व मा. श्री दीपककुमार गुप्ता ह्यांचे स्वागत शाल भेट देऊन प्राचार्य डॉक्टर पराग पाटील यांनी केले. याप्रसंगी माननीय श्री. शाम लोही यांनी संस्थेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना रस्यांवर वाहन चालवतांना दोन वाहनांतील “सुरक्षित अंतर”, ‘दोन सेकंद’ आणि “मिरर सिग्नल व मेन्यूवर” या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण संकल्पना व काही ट्रॅफिकचे नियम उपस्थितांना अत्यंत सोप्या भाषेत समजाऊन सांगितले. तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांना वाहन चालविताना वाहतूक नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले. ह्यावेळी संस्थेत सुरू असलेल्या इतर विकासात्मक कामांची माहितीही त्यांनी जाणून घेतली. उद्घाटन कार्यक्रमानंतर मा. जिल्हाधिकारी मा. श्री अभिजित राऊत व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री शाम लोही ह्यांचे हस्ते संस्थेतील फेर तपासणी केंद्रा मार्फत रि-कॅलिब्रेशन केलेल्या दोन रिक्षा चालकांना तपासणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

रिक्षा मिटर फेर-तपासणी पद्धत
संस्थेद्वारे रिक्षा मीटर फेर-तपासणीसाठी रिक्षा चालकांनी प्रथम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी नेमून दिलेल्या ‘ग्लोबल ऑटो मल्टिसर्विसेस, ३०३ बी, इंडियन रेडक्रॉस रक्त पेढी समोर, नवीन बी. जे. मार्केट, जळगाव यांचेकडे रिक्षा मिटर जमा कारावे. त्यात आवश्यक ती दुरुस्ती करुन ग्लोबल ऑटो मल्टिसर्विसेस मार्फतच फेर-तपासणीसाठी शासकीय तंत्रनिकेतनच्या यंत्र अभियांत्रिकी विभागात आणावे. संस्थेच्या यंत्र अभियांत्रिकी विभागात फेअर मिटरचे कॅलिब्रेशन करण्यासाठी “पल्समिटर” हे उपकरण बसवण्यात आले असून इतर आवश्यक बाबींची पूर्तता पूर्ण करण्यात आली आहे. तपासणीनंतर फेअर मिटर प्रमाणित करून देण्यासाठी अनुभवी प्राध्यापक प्रा. डॉ. आशिष विखार व प्रा. पी.पी.गडे ह्या तसेच प्रयोगशाळा सहायक श्री. एम. बी धबाडे व श्री. एन. डी. वेंदे ह्यांना नेमण्यात आले आहे. परिवहन विभागाच्या मार्गदर्शनानुसार व नियमाप्रमाणे ह्यासाठी रिक्शा चालकांना रु. ५९/- एवढे शासकीय शुल्क (चलान) भरावे लागेल, त्यानंतर इलेक्ट्रोनिक फेअर मीटर “पल्समीटर” ह्या उपकरणाच्या साह्याने संबंधित प्राध्यापक तपासणी करून प्रमाणपत्र देतील.

सदर कार्यक्रम प्रसंगी संस्थेतील विभाग प्रमुख श्री.डी.एम.पाटील, श्री.के.पी.वानखेडे, श्री.ए.एस.झोपे, श्री.सी.पी.भोळे, श्री.के.पी.अकोले, डॉ. पी.डी.अरगडे तसेच संस्थेतील इतर प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी प्रा. श्रीमती के. आर. रावळे, प्रा श्रीमती. पी. वाय. म्हस्के, प्रा. एम. ए. खान, श्री चंदू सपकाळे, श्री तडवी ह्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here