जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी विविध कार्यकारी सोसायटी व इतर संस्थांचे २ हजार ३८० ठराव सहकार आयुक्त कार्यालयाला पाठवण्यात आले आहेत. या ठरावांना मंजुरी मिळाल्यानंतर मतदारांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पाठवण्यात आलेल्या ठरावांमध्ये ८६१ विविध कार्यकारी सोसायटी तर १५२१ इतर संस्थांच्या ठरावांचा समावेश आहे. जिल्हा बँकेची निवडणूक घेण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी ज्योती लाठकर यांनी ११ फेब्रुवारी रोजी आदेश दिले होते. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने २३ डिसेंबर २०१९ रोजीच्या मतदार यादीच्या दिलेल्या कार्यक्रमामध्ये सुधारणा केली. २७ ते ३१ जानेवारी या मुदतीत थांबलेली संस्था सभासद प्रतिनिधीचा ठराव दाखल करण्यासाठी १५ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत देण्यात आला होता. त्यानुसार सहकार विभागाकडून विकासो व इतर संस्थांचे ठराव मागवण्यात आले होते. २२ फेब्रुवारी अखेर २ हजार ३८० ठराव प्राप्त झाले. ते ठराव सहकार विभागाच्या सहआयुक्त कार्यालयाला पाठवण्यात आलेले आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर मतदारांची प्राथमिक यादी प्रसिद्ध होईल. त्यावर आक्षेप व हरकती घेण्यात येतील. त्यानंतर सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.