जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हा बँकेसाठी भाजपने सर्वपक्षीय पॅनलची तयारी चालवली असताना राष्ट्रवादीने देखील महाविकास आघाडीच्या दृष्टीने ही निवडणूक लढविण्याचे नियोजन केले आहे. जिल्हा दौर्यावर येत असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करून सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठीचे नियोजन निश्चित केले जाणार आहे.
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीच्या पॅनलकडूनच ही निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे. भाजपने सर्वपक्षीय पॅनलसाठी विरोधी पक्षातील काही संचालक आणि इच्छुक उमेदवारांशी संवाद सुरू केलेला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने देखील सावध पवित्रा घेत महाविकास आघाडीच्या पॅनलच्या चर्चेला प्रारंभ केला आहे. पुढील आठवड्यात ११ रोजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जिल्हा दौर्यावर येत आहेत. या दौर्यात चर्चेनंतर पॅनल निर्मितीचा मार्ग मोकळा होणार आहे.
प्रदेशाध्यक्षांशी करणार चर्चा
जिल्हा बँकेसह इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पक्षाचे जिल्ह्यातील सर्व नेते, पदाधिकारी, बँकेचे संचालक यांच्याशी एकत्रितपणे चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. बँकेच्या संचालक मंडळात सध्या बहुतांश संचालक हे महाविकास आघाडीतील आहे.त्यामुळे या निवडणुकीची फारशी चिंता नाही.
-अॅड.रविंद्र पाटील,
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस