जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनची जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांना भेडसावणाऱ्या अडचणीबाबत चर्चा करण्यात येथून असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास गोरे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
श्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात आयोजित जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, प्रदेश कार्याध्यक्ष तथा जि.प. रत्नागिरी उपाध्यक्ष उदय बने, राज्य संघटक संजू वाडे, राज्य उपाध्यक्ष जय मंगल जाधव, उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष तथा जि. प. सदस्य डॉ. नीलम पाटील, असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे आदी उपस्थित होते.
या बैठकीत कोरोना काळामुळे विकास कामे करू शकले नसल्याने जि.प. सदस्यांचा कार्यकाळ १ वर्षासाठी वाढविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. तसेच आमदार हा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांचा सदस्य असल्यास तो विकास कामांना गती देण्यास पुढाकार घेवू शकत असल्याने आमदार हा या संस्थांच्या सदस्यामधूनच निवडण्यात यावा याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष यांना साधे बदलीचे अधिकार नाहीत त्यांना असे अधिकार देवून त्यांना सक्षम बनवावे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद अध्यक्ष असावेत असे ही यावेळी ठरविण्यात आले.
नवनियुक्त पदाधिकारी : जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सोनवणे, सल्लगारपदी जि. प. अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील, जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांची असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यासोबतच रावसाहेब मनोहर गिरिधर पाटील, शशिकांत पाटील, नंदकिशोर महाजन, अरुणा पाटील यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी नानाभाऊ महाजन व मधुकर काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिटणीसपदी सुरेखा पाटील तर माहिती प्रचार व प्रसार हिमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली तसेच संघटकपदी रेखा राजपूत, पवन भिलाभाऊ सोनवणे, जयपाल बोदडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर महिला जिल्हा अध्यक्षपदी जयश्री अनिल पाटील तर उपाध्यक्षपदी पल्लवी प्रमोद सावकारे, कीर्ती जालंदर चित्ते, सविता अतुल भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली