जळगाव ः प्रतिनिधी
संजीवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन तर्फे जागतिक रंगभूमी दिना’च्या निमित्ताने पुर्वसंध्येला ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या या काळात जगातील रंगभूमी समोर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे. तरीही कलावंत विविध मार्गांनी रंगभूमीवर काम करीत आहेत. नाटक करणार्या कलावंतासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो. परिवर्तन तर्फे जागतिक स्तरावर मराठी रंगभूमी याविषयावर आज २६ मार्च रोजी सायंकाळी ६ वा. चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्रात जागतिक रंगभूमीचे अभ्यासक व कादंबरीकार डॉ अविनाश कोल्हे (मुंबई), नाटक या विषयाला वाहिलेलं रंगवाचा हे मासिक गेल्या अनेक वर्षापासून कणकवली येथून प्रकाशीत करणारे संपादक वामन पंडीत, शिवाजी अंडरग्राउंड इन भिमनगर मोहल्ला या नाटकाते लेखक व अभिनेते राजकुमार तांगडे, नागपूर येथील नाट्यकलावंत रुपेश पवार, भुसावळचे रंगकर्मी अनिल कोष्टी हे वक्ते सहभागी होतील. या चर्चासत्रात रंगकर्मी नारायण बाविस्कर व मंजुषा भिडे या भूमिका मांडणार आहेत. या चर्चासत्राला उपस्थिती द्यावी असे आवाहन परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी केले आहे.