जळगाव, प्रतिनिधी । शहरातील खड्डेमय रस्त्यांची अवस्था जळगावकरांसाठी खूप तापदायक ठरत आहे. महापालिका प्रशासन याकडे डाेळेझाक करीत असल्याने हा प्रश्न अवघड झाला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशन व युवक बिरादरीने पुढाकार घेऊन शहरातील खड्डे बुजवण्याची माेहीम हाती घेतली आहे.
बुधवारपासून या माेहिमेला सुरुवात होणार असल्याची माहिती बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा काबरा यांनी दिली. शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तरी देखील मनपाने ठाेस असे कार्य सुरू केलेले नाही. काही भागात मनपाने खड्डे बुजवले मात्र अनेक रस्त्यांवर अजूनही खड्डे आहेत. खड्ड्यांमुळे वाहनाधारकांना विविध व्याधी जडल्या आहेत. काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी चौक, शिरसोली नाका ते काव्यरत्नावली चौक, शिव कॉलनी परिसरातील रस्ते, आशाबाबानगर, हरिविठ्ठलनगर, खंडेरावनगर या परिसरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे स्वखर्चाने बुजवण्यात येणार आहे.