जळगाव महानगरपालिका कर्मचारी वेतनाविना !

0
16

जळगाव ः विशेष प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिका शहरात कोणतेच नवीन विकास कामे करीत नाही,पण महापालिकेत जे राबतात त्या कर्मचार्‍यांचे वेतन तरी वेळेवर मिळायला हवे.आता ते सुद्धा मिळण्याची व्यवस्था नाही .जानेवारी महिन्याचा पगार आज पावेतो कर्मचार्‍यांना मिळालेला नाही आणि सुट्या आल्यामुळे जानेवारीचे वेतन मिळायचे असेल तर २२ फेब्रुवारी नंतरच मिळेल अशी शक्यता कर्मचार्‍यांनी सांगितली आहे.त्यामुळे सार्‍याच अडचणी असल्याचे सांगतानाच याकामी महानगरपालिका आस्थापना विभागाची अनास्था कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते.
जळगाव महापालिका कर्मचार्‍यांचा वेतनाचा प्रश्न अत्यंत गंभीर असा म्हटला जात होता. काही वर्षांपूर्वी तर तीन -चार महिने कर्मचार्‍यांना वेतन मिळत नव्हते.त्यांना कधी कोणत्या महिन्याचे वेतन मिळाले हे तपासावे लागत होते म्हणजे जानेवारीचे वेतन एप्रिलमध्ये अशी स्थिती होती.परिणामी कर्मचार्‍यांच्या अडचणी वाढल्या होत्या.त्यांना किराणा दुकानदार उधार द्यायला तयार होईनात आणि बँका कर्जासाठी दारावर उभेही करीत नसत.अर्थात कायम कर्मचारी असतांना या स्थानिक स्वराज्य संस्थेने त्यांची इभ्रत घालविली होती.
तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी कर्मचार्‍यांच्या वेतनाची गाडी रुळावर आणली आणि त्यांना त्यांचे वेतन पुढच्या महिन्याच्या किमान ५ तारखेपर्यंत मिळायला लागले होते,मिळतही होते पण आता त्यात पुनश्च अडथळे आणण्यात येत असल्याचे चित्र आहे.त्यासाठी काही तांत्रिक अडचणी सांगितल्या जातात मात्र महानगरपालिकेच्या आस्थापना विभागाची अनास्था त्यास कारणीभूत असल्याचे कर्मचार्‍यांकडून सांगितले जाते.
कुणाच्याही हातात पैसा नसेल (तो ही हक्काचा) तर त्यांचे कोणतेच काम होऊ शकत नाही ही वस्थुस्थिती आहे हे कुणीच नाकारत नाही व नाकारणार नाही .रोजचे दोन वेळचे जेवण,आवश्यक धान्य-किराणा माल, घरभाडे.गृह कर्ज घेतले असेल तर त्याचे हप्ते व इतर कर्ज असेल त्याचे हप्ते,विम्याचे हप्ते,कुटुंबासाठी दवाखाना खर्च,मुलांचे शिक्षण,लाईट बिल.असा साराच खर्च वेतनातून भागवला जात असतांना वेतनच हातात येणार नसेल तर बिचारा कर्मचारी करणार काय?
जळगाव महापालिकेकडून कर्मचार्‍यांच्या वेतनाचे बिल(पगारबिले) करण्याचे काम पुण्याच्या संस्थेकडे दिले असल्याची माहिती मिळते व त्यांच्याकडून अद्याप बिले प्राप्त झालेली नसल्याने वेतनास विलंब झाला असल्याचे सांगण्यात येते.हे जर खरे असेल तर ती बिले करण्याचे काम पुण्याच्या संस्थेस का दिले, असा प्रश्न पडतो आणि पगारबिले तयार करण्यासाठी ठेकेदार हवाच कशाला?असाही प्रश्न येतो.यापूर्वीही आस्थापना विभाग तशी बिले तयार करायचाच ना.तेव्हा जर करीत होते तर आता का नाही ? हा प्रश्नही कर्मचारीच करीत आहेत.
विद्यमान आस्थापना अधीक्षक राजेंद्र पाटील यांच्याकडे कर्मचारी बोट उचलीत आहेत.बिले तयार करण्यास विलंब सॉफ्टवेअर खराब झाल्याने झाला असल्याची माहिती कर्मचार्‍यांना सांगितली जात आहे पण त्या सॉफ्टवेअरच्या खराबीमुळे शेकडो कर्मचार्‍यांच्या जीवनाचे सॉफ्टवेअर बिघडत चालले आहे याची दखल कोण घेणार,आयुक्त साहेब ,उपायुक्त, संबंधित अधिकारी व पदाधिकार्‍यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणें गरजेचे तितकेच अत्यावश्यक असल्याची मागणी कर्मचार्‍यांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here