जळगाव : प्रतिनिधी
येथील दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेच्या संचालक मंडळ सदस्यांची २०२१-२०२६ या कालवधीकरिता निवडणूक प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक (सांगली) एन.डी. करे यांचेकडून राबविण्यात आली.
त्यांच्या अध्यक्षतेखाली आज २४ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता बँकेच्या सभासदांची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने व्हिडिओ कॉन्फरन्स / ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाद्वारे घेण्यात आली. सदर सभेस ऑनलाईन पध्दतीने सुमारे ६०० पेक्षा जास्त सभासदांची उपस्थिती होती. सभेच्या सुरूवातीस बँकेच्या बोर्ड सेक्रेटरी श्रीमती स्वाती सारडा यांनी बँकेच्या नियमानुसार कोरम पूर्ण असल्याने सभेस सुरूवात करण्यासाठी सभेचे सूत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सुपूर्द केले.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सभेला सुरूवात करून निवडणूक कार्यक्रम प्रसिध्द केल्यापासून आजच्या सर्वसाधारण सभेपर्यंत झालेल्या प्रकियेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. सर्व महत्वाच्या बाबी सभासदांबरोबरत मांडल्या. प्रामुख्याने या निवडणुकीसाठी एकूण २७ सभासदांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी घेतलेली होती. त्यापैकी २४ सभासदांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानुसार नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी बँकेचे मुख्य कार्यालय, दाणा बाजार, जळगाव येथे नोटीस बोर्डावर लावण्यात आली. ६ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्राच्या छाननीमध्ये ९ उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. तसेच एका उमेदवाराने नामनिर्देशन पत्र माघारी घेतले. दि. १५ एप्रिल २०२१ रोजी माघारी नंतर राहीलेल्या नामनिर्देशन पत्राची अंतिम यादी सकाळी ११ वा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या तसेच बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली.
दि मल्टिस्टेट को-ऑप सोसायटी ऍक्ट २००२, दि मल्टिस्टेट को – ऑप सोसायटीज रूल्स २००२, आणि त्यामध्ये असलेले शेड्युल आणि बँकेच्या उपविधीप्रमाणे एकूण १४ संचालक मंडळ सदस्यांची वर्गवारीनुसार निवड करावयाची होती.त्यानुसार माघारीनंतर १४ उमेदवारांचे अर्ज बाकी राहिल्याने, सदर १४ उमेदवार हे बॅकेंच्या संचालक मंडलाचे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी सभेमध्ये जाहीर केले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सभेस उपस्थित असलेल्या सर्व सभासदांचे व निवडून आलेल्या उमेदवार संचालकांचे अभिनंदन केले.
बँकेचे नवनिर्वीचित संचालक मंडळ
पाटील भालचंद्र प्रभाकर, कोठारी प्रकाश मांगीलाल, चौधरी चंद्रकांत बळीराम, पाटील सुनिल प्रभाकर, जाखेटे रामेश्वर आनंदराम, खडके प्रवीण वासुदेव, मोराणकर ज्ञानेश्वर एकनाथ, पाटील अनिकेत भालचंद्र, अत्तरदे चंदन सुधाकर, बोरोले विलास चुडामण, महाजन सुहास बाबुराव, पाटील स्मिता प्रकाश, चौधरी सुरेखा विलास, परमार राजेश धिरजलाल