जळगाव प्रतिनिधी | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या मतदानास आज सकाळी आठ वाजेपासून प्रारंभ झाला असून याची मतमोजणी उद्या होणार आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात जेडीसीसी बँकेच्या निवडणुकीत आधीच ११ जागा बिनविरोध झाल्या असून या माध्यामातून महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. तर बँकेच्या ९ मतदारसंघातील १० जागांसाठी आज सकाळी आठ वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला आहे.
यात जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे ८५३ आणि इतर संस्थाचे २ हजार मतदार त्यात मतदान करणार आहेत. यासाठी जिल्ह्यात १५ मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलला शेतकरी विकास पॅनलने आव्हान दिली आहे. सहकार पॅनलमध्ये माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे-खेवलकर, शैलजा निकम आदी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर शेतकरी विकास पॅनलतर्फे जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सभापती रवींद्र पाटील, कॉंग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस डी. जी. पाटील यांच्या पत्नी अरुणा पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा समन्वयक विकास पवार हे रिंगणात आहेत. उद्या सकाळी जिल्हा बँकेच्या सभागृहात आठ वाजेपासून याची मतमोजणी होणार आहे.